पणजी (पुढारी वृत्तसेवा):
गतवर्षी कार्यक्रमावेळी झालेली मारामारीची घटना विचारात घेत सरकारने सांतआंद्रे मतदारसंघातील आगशी येथे २२ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या झारखंड दिन सोहळ्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी आरजीच्या वतीने उत्तर गोवा जिल्हाधिकारी यांनी बुधवारी करण्यात आली आहे.
सांतआंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांच्यासह आरजीच्या पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन सादर करत जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी केली आहे. याबाबत बोरकर म्हणाले की, २२ नोव्हेंबर रोजी सांतआंद्रे मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या झारखंड दिन साजरा करण्यास परवानगी देऊ नये ही आमची मागणी आहे. मागील वर्षी सोहळा आयोजित करण्यासाठी ५ हजार लोक जमणार असे सांगून परवानगी घेण्यात आली होती.
प्रत्यक्षात मात्र, १५ हजारांहून अधिक लोक जमले होते. त्यानंतर तिथे झालेल्या हाणामारीच्या घटनेमुळे स्थानिकांना मात्र, घाबरून घरात लपून बसावे लागते. आयोजकांचे म्हणणे आहे की, जर या सोहळ्याला कोणी विरोध केला तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी धमकी दिली जात आहे.
झारखंडमधील भाजप पदाधिकारी हा सोहळा आयोजित करण्यासाठी मुख्यमंत्री, माजी आमदार, संभाव्य इच्छुक भाजप उमेदवार आदींच्या गाठीभेटी घेत आहेत. याला स्थानिक पंच सदस्यांनी विरोध केलेला आहे.