पणजी (पुढारी वृत्तसेवा):
राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी गुरुवारी विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षणाची (एसआयआर) माहिती देण्यासाठी बोलावलेल्या नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या बैठकीला रिव्होल्युशनरी गोव्हन्स पार्टीच्या (आरजी) वतीने शविना नाईक शिरोडकर (बोरकर गट) आणि अजय खोलकर (खोलकर गट) यांनी प्रतिनिधी म्हणून हजेरी लावली. त्यामुळे आरजीचा अधिकृत गट नेमका कोणता, हा प्रश्न पुन्हा एरणीवर आला आहे.
याबाबतचा अंतिम निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगच घेऊ शकतो, असेही स्पष्ट झाले. खोलकरांची सही स्वीकारली आणि शविनाच्या सहीला नकार दिल्यामुळे आरजी कोणाची, हा पेच कायम आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. संजय गोयल यांनी सांगितले की, गुरुवार, १२ नोव्हेंबरपासून एसआयआर प्रक्रिया सुरू झाली. या प्रक्रियेची माहिती देण्यासाठी नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. आरजीच्या अजय खोलकर यांनाच सही करण्यास मान्यता दिली.
शविना शिरोडकर यांना दिली नाही. याबाबत अधिक माहिती देताना शविना शिरोडकर म्हणाल्या, बैठकीला राजकीय पक्षांच्या कोणत्या प्रतिनिधींनी हजेरी लावली, त्याची माहिती द्यावी, असे पत्र पक्षाने सीईओला दिलेले आहे. पत्राचे उत्तर आल्यानंतर खरे कोण व खोटे कोण? हे जनतेला कळणार आहे, असे त्या म्हणाल्या.
बैठकीला उपस्थित राहण्याचे पत्र आमच्याच पक्षाला आले होते. त्यामुळे आरजीचा प्रतिनिधी म्हणून मी बैठकीला उपस्थित होतो. शविना शिरोडकर बैठकीला का उपस्थित होत्या, ते मला माहिती नाही, असे अजय खोलकर यांनी बैठकीनंतर सांगितले.
प्रतिनिधींना पक्षाचा कार्यालयीन पत्ता म्हणून नोंद असलेल्या पत्त्यावरच नोटिस पाठवण्यात आली होती. आरजीचा अधिकृत गट कोणता, असे विचारले असता डॉ. गोयल म्हणाले की, याबाबत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय काहीही सांगू शकत नाही. पक्षात वाद असल्यास संबंधितांनी दिल्लीतील केंद्रीय निवडणूक आयोगकडे जाऊन तो सोडवावा.
आयोग यावर अंतिम निर्णय घेईल. आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांनी पक्ष कार्यालयाचा पत्ता बदलण्याबाबत अर्ज केला होता. त्यावर काय निर्णय झाला, असे विचारले असता, कार्यालयाला प्राप्त होणारी कागदपत्रे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवली जातात, असे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीनंतर अजय खोलकर यांनी पत्रकारांशी बोलताना आपलाच गट अधिकृत असल्याचा दावा केला. निवडणूक आयोगाने आपल्यालाच पत्र पाठवले होते, असे त्यांनी सांगितले. तसेच, २२ नोव्हेंबर रोजी पक्षाचे माजी अध्यक्ष मनोज परब राजकारणात पुनरागमन करून पक्षाचे प्राथमिक सदस्यता स्वीकारणार आहेत, असे त्यांनी सांगितले. आरजीच्या प्रदेशाध्यक्ष (बोरकर गट) शविना नाईक शिरोडकर यांनी मनोज परब यांच्या पक्षप्रवेशाबाबत कोणताही प्रस्ताव पक्षाकडे आलेला नसल्याचे स्पष्ट केले.