पणजी : म्हादई पाणी वाटपासंदर्भात केंद्रीय जल आयोगाने स्थापन केलेल्या 'प्रवाह' समितीची पुढील बैठक २५ ऑक्टोबर रोजी गोव्यात होत आहे. यावेळी 'प्रवाह' समिती सदस्यांनी म्हादई नदीपात्राची पुनर्पाहणी करावी, अशी मागणी राज्य सरकारच्या वतीने केली असल्याची माहिती आहे.
या प्रवाह अधिकारणीने ४ ते ७ जुलै या दरम्यान गोव्यासह, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील म्हादई नदीपात्राची पाहणी केली होती. मात्र, यादरम्यान कर्नाटकाने वळवलेल्या पाण्याच्या ठिकाणांना या समितीने भेट दिली नव्हती. त्यामुळे या अधिकारणीने ८ जुलै रोजी बंगळूर येथे झालेल्या बैठकीच्या अहवालामध्ये त्याचा उल्लेख केलेला नाही. या कारणाने राज्य सरकारच्या जलस्रोत खात्याने या सदस्याने संपूर्ण नदी पात्राची पुनर्पाहणी करावी, अशी मागणी केली आहे.
२५ ऑक्टोबरपूर्वी या सदस्याने या संपूर्ण नदीपात्राची पाहणी करून आपला अहवाल सादर करावा. ज्या आधारे कर्नाटकाच्या बेकायदेशीर कृत्यांचा पर्दाफाश होईल आणि राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयात आपली भूमिका मांडता येईल, असेही जलस्त्रोत खात्याच्या वतीने सांगण्यात आले आहे.