पणजी : प्रभाकर धुरी
महाराष्ट्र राज्याचे 'अॅमेझॉन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि समृद्ध जैवविविधतेने नटलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिळारी खोऱ्यात पुन्हा एकदा दुर्मिळ 'वनमानवा'चे (स्लेंडर लॉरिस / लाजवंती) दर्शन झाले आहे. विशेष म्हणजे यावेळी लाजवंतीच्या मिलनाची नोंद करण्यात आली आहे. दोडामार्गमधील वन्यजीव अभ्यासक जंगलात भ्रमंती करत असताना एका विशिष्ट आवाजाने त्यांचे लक्ष वेधले आणि अनपेक्षितपणे स्लेंडर लॉरीसच्या नर आणि मादीचे दर्शन घडले आणि मिलनाचे काही क्षणही पाहायला मिळाले.
रात्रीच्या वेळी घडणाऱ्या या प्रजनन वर्तनाची नोंद वन्यजीव अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे तिळारीतून या प्रजातीच्या मिलनाची नोंद वन्यजीव अभ्यासक मकरंद नाईक यांच्यामुळे झाली. यावेळी स्थानिक वन्यजीव निरीक्षक उदय सातार्डेकर, संजय नाटेकर, ऋषिकेश पावसकर, वन्यजीव अभ्यासक गणेश मर्गज आणि माजी वन अधिकारी सुभाष पुराणिक उपस्थित होते. दोडामार्ग तालुक्यातील केर, मांगेली ते विर्डी या भागातील जंगलांमध्ये याची नोंद आढळते. भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ अंतर्गत 'स्लेंडर लॉरिस'ला अनुसूची १ मध्ये समाविष्ट करण्यात आले असून त्याला सर्वोच्च कायदेशीर संरक्षण प्राप्त आहे.
मात्र, सध्या वाढती वृक्षतोड, मानवी हस्तक्षेपामुळे अधिवासाचा होणारा हास आणि अवैध तस्करी यामुळे या प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर (आययूसीएन) या निसर्ग संवर्धनासाठी काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटनेने वनमानवाला लुप्तप्राय श्रेणीमध्ये घालून 'लाल यादी'त समाविष्ट केले आहे. तिळारी परिसरातील वाढती जंगलतोड ही येथील जैवविविधतेसाठी अत्यंत चिंतेची बाब आहे. या हस्तक्षेपाला वेळेत आळा घालून दुर्मिळ वन्यजीवांचे रक्षण करणे गरजेचे आहे. पश्चिम घाटाचे अभ्यासक डॉ. माधव गाडगीळ यांनी सादर केलेल्या सविस्तर अहवालाचा अभ्यास करून केंद्र सरकारने पर्यावरण संवर्धनासाठी ठोस निर्णय घेतला, तरच येथील जैवविविधता टिकून राहणार आहे.
स्लेंडर लॉरिस : निसर्गाचा आविष्कार
'स्लेंडर लॉरिस' हा मुख्यत्वे दक्षिण भारत आणि श्रीलंकेतील घनदाट जंगलांत आढळणारा अतिशय दुर्मिळ व लहान आकाराचा माकड प्रवर्गातील सस्तन प्राणी आहे. या प्राण्याची लांबी साधारण ५ ते १० इंच असून वजन २५० ते ३०० ग्रॅमच्या आसपास असते. याचे डोळे गोल व मोठे, तर हात-पाय लांब व सडपातळ असतात. याला शेपटी नसते. मानवासारख्या दिसणाऱ्या शारीरिक वैशिष्ट्यांमुळेच स्थानिक भाषेत याला 'वनमानव' म्हटले जाते. हा पूर्णपणे निशाचर प्राणी असून रात्रीच्या वेळी अन्नाच्या शोधात बाहेर पडतो. लहान किडे, पक्ष्यांची अंडी, पाली आणि छोटे सरपटणारे प्राणी हे त्याचे मुख्य खाद्य आहे. हा प्राणी अतिशय शांत, भित्रा आणि लाजाळू स्वभावाचा असून झाडांवरच राहणे पसंत करतो. दिवसा झाडांच्या ढोलीत किंवा पानांच्या आडोशाने तो लपून राहतो.
पिल्लांच्या जन्माविषयी थोडेसे.....
पिल्लांच्या जन्माबाबतही अभ्यासकांमध्ये फरक दिसतो. काही निरीक्षणांमध्ये एकच पिल्लू, तर काहींमध्ये जुळी पिल्ले आढळली आहेत. जन्मानंतर सुरुवातीच्या काळात पिल्ले मादीला घट्ट धरून राहतात. साधारण चार आठवड्यांनंतर मादी त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवून अन्नाच्या शोधासाठी बाहेर पडते. स्लेंडर लॉरिसचा प्रजननदर तुलनेने कमी असून, पिल्लांच्या संगोपनासाठी मादीला मोठी ऊर्जा खर्च करावी लागते. त्यामुळे त्याच्या प्रजननवर्तनाची प्रत्येक नोंद या दुर्मिळ वन्यजीवाच्या जीवनचक्राचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरते. तिलारीतील या मिलनाची नोंद भविष्यातील निरीक्षणे, प्रजनन हंगामाचे आकलन आणि संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरू शकते.
दुर्मीळ प्राणी जगवण्यासाठी 'इको सेन्सिटिव्ह'च हवा : सावंत
अवैध वृक्षतोड, अवैध शिकार आणि या भागात येऊ घातलेले विकास प्रकल्प, गरज नसताना मंजूर केलेले रिंग रोड, आणि तिळारीच्या बँक वॉटरमध्ये असलेले खडी क्रशर यामुळे हत्ती, वाघ, गवे, अस्वल, बिबटे, किंग कोब्रा यांसारखे वन्यजीव अधिवास क्षेत्र सोडून लोकवस्तीत येत आहेत. आता स्लेंडर लॉरीसचे अधिवास व प्रजनन क्षेत्र याच जंगलात असल्याचे सिद्ध झाले आहे. अनुसूची १ मधील अनेक वन्यप्राणी तिळारीत असूनही दोडामार्ग तालुका इको सेन्सिटिव्ह झोनमधून वगळण्यात आला आहे. या प्राण्यांचे संरक्षण करायचे असेल, तर तालुका इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये समाविष्ट व्हायलाच हवा, असे मत मानद वन्यजीव रक्षक संजय सावंत यांनी मांडले.
गोव्यातही स्लेंडर लॉरिसचा आढळ
गोव्यातील मोले येथे भगवान महावीर अभयारण्य व तांबडी सुर्ला आणि सत्तरी परिसरातील घनदाट जंगलांमध्ये अत्यंत दुर्मिळ व संकटग्रस्त असलेला ग्रे स्लैंडर लॉरिस आढळल्याच्या नोंदी आहेत. नागवे वाळपई येथे ८ एप्रिल २०२४ रोजी वर्षा परवार या मुलीला तिच्या घराच्या मागच्या बाजूला लाकडी कुंपणावर वनमानव बसलेला दिसला होता. त्याला नंतर सुरक्षितपणे रेस्क्यू करून जंगलात सोडण्यात आले होते, गोव्यातील जंगल भागात वनमानवाचा वावर आढळला आहे.
स्लेंडर लॉरिसच्या गर्भधारणेविषयी...
मिलनाच्या वेळी मादीच्या मागे अनेक नर जाणे, तिचा पाठलाग करणे आणि एकाच मादीसोबत एकापेक्षा अधिक नरांचे मिलन होणे, असे वर्तन अभ्यासांमध्ये नोंदवले आहे. काही क्षेत्रीय निरीक्षणांनुसार, एका मादीसोबत तीन ते चार नर क्रमाने मिलन करू शकतात. गर्भधारणेचा कालावधी साधारण पाच ते साडेपाच महिने, म्हणजेच सुमारे १६३ ते १७० दिवस, असल्याचे विविध अभ्यासांत आढळते,
आणखी तीन पिल्लांचे दर्शन
मीलनाच्या नोंदीनंतर मानद वन्यजीव रक्षक संजय सावंत सलग तीन दिवस स्लेंडर लॉरीसच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. यावेळी सावंत यांना आणखी छोटी तीन पिल्ले आढळली. त्यांचा वावर स्वतंत्र सुरु असून ती स्वतः खाद्य शोधत असल्याचे आढळले. सावंत म्हणाले की, गेली दोन वर्ष त्या भागात अस्तित्व असल्याचे पुरावे होते; परंतु जोडीने असल्याचे प्रथम निदर्शनास आले. त्याठिकाणी खूप छान प्रजननाचे केंद्र आहे
दुर्मीळ प्राणी जगवण्यासाठी 'इको सेन्सिटिव्ह'च हवा : सावंत
अवैध वृक्षतोड, अवैध शिकार आणि या भागात येऊ घातलेले विकास प्रकल्प, गरज नसताना मंजूर केलेले रिंग रोड, आणि तिळारीच्या बँक वॉटरमध्ये असलेले खडी क्रशर यामुळे हत्ती, वाघ, गवे, अस्वल, बिबटे, किंग कोब्रा यांसारखे वन्यजीव अधिवास क्षेत्र सोडून लोकवस्तीत येत आहेत. आता स्लेंडर लॉरीसचे अधिवास व प्रजनन क्षेत्र याच जंगलात असल्याचे सिद्ध झाले आहे. अनुसूची १ मधील अनेक वन्यप्राणी तिळारीत असूनही दोडामार्ग तालुका इको सेन्सिटिव्ह झोनमधून वगळण्यात आला आहे. या प्राण्यांचे संरक्षण करायचे असेल, तर तालुका इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये समाविष्ट व्हायलाच हवा, असे मत मानद वन्यजीव रक्षक संजय सावंत यांनी मांडले.