Caranzalem Beach file photo
गोवा

Caranzalem Beach | करंझाळे समुद्रकिनारी पोलिस गस्त सुरू करण्याची मागणी

Caranzalem Beach | करंझाळे-मिरामार समुद्रकिनाऱ्यावरील परिसरात गुन्हेगारी कारवायांत वाढ होत आहे. रात्रीच्यावेळी मद्यप्राशन तसेच दंगामस्तीच्या घटना दिवसेंदिवस घडत आहेत.

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

करंझाळे-मिरामार समुद्रकिनाऱ्यावरील परिसरात गुन्हेगारी कारवायांत वाढ होत आहे. रात्रीच्यावेळी मद्यप्राशन तसेच दंगामस्तीच्या घटना दिवसेंदिवस घडत आहेत. हा परिसर सायंकाळाच्यावेळी लोकांना धोकादायक ठरू लागल्याने या किनाऱ्यावर २४ तास पोलिस गस्त सुरू करण्याची मागणी रापणकार संघटनेने केली आहे.

करंझाळे समुद्रकिनारी एखादी घटना घडल्यास काही दिवस पोलिस गस्त ठेवली जाते. मात्र काही दिवसांनी त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्याचा फायदा गुन्हेगारी वृत्तीचे लोक उठवत आहेत, असा आरोप संघटनेचे फ्रांसिस वाझ यांनी केला.
हल्लीच या किनाऱ्यावर अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचाराची घटना दुर्दैवी आहे. पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली असली तरी काही लोक त्याच्या बचावासाठी चुकीची माहिती देत आहेत. तो तरुण करंझाळेतील कोणत्याही मच्छिमाराकडे कामाला नव्हता.

अनेकदा या किनाऱ्यावर एखादी गुन्हेगारी घटना घडली तर यामध्ये मच्छिमारांना विनाकारण ओढले जाते. त्यामुळे रापणकार मच्छिमारांकडे काम करणाऱ्या कामगारांना लवकरच ओळखपत्रे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे व त्यासंदर्भात मच्छिमार खात्याच्या अधिकाऱ्यांकडे चर्चा केली असल्याचे वाझ म्हणाले.

पोलिसांनी ठोस पावले उचलावीत:

करंझाळे समुद्रकिनाऱ्यावर रापणकार मच्छिमाराचा धंदा करतात. या परिसरात एखाद्या व्यक्तीला मद्यप्राशन करताना सापडल्यास पोलिसांनी चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले तर ते मच्छिमारांकडे कामाला असल्याचे सांगून खोटी माहिती देतात. पोलिसही त्यामध्ये गांभीर्याने त्याची शहानिशा करत नाहीत. किनाऱ्यावर असे गुन्हेगारी प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी ठोस पावले उचलावीत तसेच या भागात पर्यटक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी रापणकार संघटनेने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT