Goa News Ramesh Tawadkar  Pudhari photo
गोवा

Goa Dhangar Community | "एसटी दर्जासाठी धनगर समाजाला पाठिंबा! आदिवासी कल्याणमंत्री रमेश तवडकर यांचे मोठे वक्तव्य"

Goa Dhangar Community | आदिवासी कल्याणमंत्री रमेश तवडकर : लागेल ते सहकार्य करण्यास तयार

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

धनगर समाजाला एसटीचा दर्जा मिळावा यासाठी माझा पूर्ण पाठिंबा आहे, त्यांना गरज भासेल, तेव्हा मी मदतीसाठी तयार आहे, असे प्रतिपादन आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकर यांनी बुधवारी उत्तोर्डा येथे केले. मंत्री तवडकर म्हणाले, हा समाज या मान्यतेस पात्र आहे. त्यामुळे या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सरकार सर्वोच्च स्तरावर चर्चा घडवून आणेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

उत्तोर्डा येथे आयोजित 'गोवा ट्रायबल व्हिजन २०३७' परिषदेच्या निमित्ताने बोलताना तवडकर म्हणाले की, धनगर समाजाने अनुसूचित जमाती चळवळीदरम्यान गोव्याच्या आदिवासी समुदायांना पाठिंबा दिला होता आणि त्यांनाही तसाच पाठिंबा मिळायला हवा.

आमच्या समाजाने धनगर समाजाचा अनुसूचित जमातींच्या यादीत समावेश करण्यास कधीही विरोध केलेला नाही. धनगर हे भटक्या आदिवासी समाजाचे असून, ते आमचेच बांधव आहेत. खरे तर, धनगर समाजाला आमच्यापेक्षाही जास्त अनुसूचित जमाती दर्जाची गरज आहे, असेही तवडकर यांनी नमूद केले.

१५ ऑगस्टनंतर समाजाने प्रस्तावित केलेल्या आंदोलनाचा संदर्भ देत तवडकर म्हणाले की, मंत्री म्हणून आपण त्यात सहभागी होऊ शकत नसलो, तरी संवादाद्वारे हा प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.

त्यांच्यासाठी मी मुख्यमंत्र्यांकडे किंवा नवी दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांकडेही यायला तयार आहे, हे मी त्यांना सांगितले आहे. मुख्यमंत्री व केंद्रीय नेत्यांसोबत बैठका आयोजित करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तांत्रिक समितीमार्फत सादर करावी लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आदिवासी कल्याण निधीवर प्रतिक्रिया देताना तवडकर म्हणाले की, मी या पदावर येण्यापूर्वी निधीचे नीट व्यवस्थापन होत नव्हते, नियंत्रण ठेवणारा कोणी नसल्याने दोन ते तीन टक्के निधी वापरला जायचा आणि उर्वरित परत जायचा.

निधीसाठी ज्या पद्धतीने प्रस्ताव यायला हवे होते, तसे येत नव्हते. त्यामुळे बजेट कमी व्हायचे. निधी वापरला, तर आणखी मागता येतो आणि मिळू शकतो. निधीचा अधिक चांगला वापर आणि नवीन प्रस्तावांमुळे भविष्यात अधिक केंद्रीय निधी मिळण्यास मदत होईल, असा विश्वासही तवडकर यांनी व्यक्त केला.

त्या स्टेडियमच्या छताची दुरुस्ती लवकरच

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या गेट क्रमांक ८ जवळ छताचे पत्रे उडून गेल्याबद्दल मंत्री तवडकर म्हणाले, मी क्रीडा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत घटनास्थळाची पाहणी करून तत्काळ दुरुस्ती सुनिश्चित करून. मात्र, प्रत्येक पावसाळ्यात ही समस्या पुन्हा उद्भवल्यास कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा विचार नक्की केला जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT