पणजी : पुढारी वृत्तसेवा
आदित्य धर दिग्दर्शित 'उरी' चित्रपटात केवळ एका दृश्यापुरती भूमिका असल्याने सुरुवातीला आपण हा चित्रपट नाकारला होता. मात्र, धर यांनी ती भूमिका आपल्यासाठीच लिहिल्याने चित्रपट केल्याचे सांगत यातूनच 'धुरंधर'मधील भूमिकाही निश्चित झाल्याचा अनुभव ज्येष्ठ चित्रपट अभिनेते राकेश बेदी यांनी सांगितला.
इफ्फीअंतर्गत इंडियन पॅनोरमाचे उद्घाटन शनिवारी आयनॉक्समध्ये करण्यात आले. यावेळी केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याचे सचिव चंचल कुमार, एनएफडीसीचे अध्यक्ष जी. कृष्णकुमार, इफ्फीचे संचालक आशुतोष गोवारीकर व चंचल कुमार आदी उपस्थित होते.
'बिनिगिंग' या लघुपटाने आणि 'धुरंधर' चित्रपटाच्या प्रदर्शनाने इंडियन पॅनोरमाची सुरुवात झाली. यावेळी 'धुरंधर'मध्ये वेगळी भूमिका साकारणाऱ्या बेदी यांनी 'उरी' चित्रपटासंदर्भातील अनुभव सांगितला. 'धुरंधर'मधील लॅरिसा सेट बँकॉक येथे उभारण्यात आला होता. तो बराच मोठा होता. आदित्य धर हे असामान्य दिग्दर्शक असल्याचे बेदी म्हणाले.
यावेळी बोलताना चंचल कुमार म्हणाले की, यंदाच्या इफ्फीची संकल्पना 'सीमाविरहित कथा' अशी आहे. भारतीय उपखंडात या संकल्पनेला नैसर्गिक अभिव्यक्ती मिळते. भारतातील प्रत्येक प्रदेशाची स्वतःची भाषा, प्रादेशिक सांस्कृतिक स्मृती आणि कथा सांगण्याची वेगळी पद्धत आहे. या माध्यमातून प्रेक्षकांसमोर विविध पैलू सादर करण्याची आमची वचनबद्धता दिसून येते.
वेधमालिकांसह सर्जनशीलतेच्या नव्य प्रकारांना मान्यता देणे आणि चित्रपट अधिक सुलभ करणे, यांचा याम समावेश आहे. यंदाच्या भारतीय चित्रपटसृष्टीला समृद्ध करणाऱ्या आणि प्रेक्षका सादर करणाऱ्या सर्व निवडक चित्रपट निर्मात्यांचे तसेच परीक्षक समित्यांच्या अध्यक्षांचे त्यांनी अभिनंदन केले. गोवा सरकार, गोवा मनोरंजन संस्था आणि महोत्सवाच्या आयोजनाशी संबंधित सर्व संस्थांच्या प्रयत्नांमुळे भारतीय चित्रपटसृष्टीला देशाच्या विविधतेतून ताकद मिळते, असे ते म्हणाले.
आशुतोष गोवारीकर यांनी १९८४ मध्ये दिल्ली आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी झाल्याच्या आठवणींना उजाळा दिला. ते अभिनेता म्हणून आपला पहिला चित्रपट होता. तेव्हापासून आजपर्यंत भारतीय चित्रपटसृष्टीची भरभराट होताना आपण पाहत आहोत. यंदा महोत्सवाचे संचालकपद भूषवण्याची संधी मिळणे हे आपले मोठे भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले.
दरवर्षी भारताला एक साधा प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे आपण कोणत्या कथा सांगत आहोत? प्रादेशिक चित्रपटांतून विविध भाषांमधील स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडते, असे गोवारीकर म्हणाले.
जी. कृष्णकुमार यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. चित्रपट विभागाच्या परीक्षक समितीचे अध्यक्ष दिग्दर्शक मधुर भांडारकर आणि त्यांच्या सहकारी सदस्यांचा, तसेच लघुपट विभागाच्या परीक्षक समितीचे अध्यक्ष शेखजित डे व सदस्यांचा लघुपटाच्या दिग्दर्शिका लीना यादव यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
१८ भाषांतील चित्रपटांच्या ७६२ प्रवेशिका
इंडियन पॅनोरमासाठी यंदा १८ भाषांतील ७६२ चित्रपटांच्या प्रवेशिका आल्या होत्या. त्यातून २५ चित्रपटांची निवड करण्यात आली, तर ३०० लघुपटांतून २० लघुपट (नॉन फिचर फिल्म) निवडण्यात आले, अशी माहिती आशुतोष गोवारीकर यांनी दिली.