पणजी : गोव्यात अलिकडच्या काळात ड्रग्ज मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले आहे. नुकताच पुण्यातील कृष्णा सोनकेल्लू (वय 28) हा तरुण अमली पदार्थ घेऊन गोव्यात आला होता. अमली पदार्थ विरोधी कक्षाच्या (एएनसी) पोलिसांनी शनिवारी त्याला अटक केली. तो दापोडी-पुणे (महाराष्ट्र) येथील राहणारा आहे. आंतरराज्य ड्रग्ज रॅकेटशी तो संबंधित आहे.
त्याच्याकडून 45.5 ग्रॅम मेथाम्फेटामाईन ड्रग्ज जप्त करण्यात आला असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत सुमारे 6.82 लाख रुपये असल्याची माहिती एएनसीच्या पोलिस अधीक्षक सुनिता सावंत यांनी दिली. राज्यात आठवड्याच्या अखेरीस ड्रग्ज विक्री करण्यासाठी पुण्यातून एक व्यक्ती ड्रग्ज घेऊन येत असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी कक्षाच्या अधिकार्यांना मिळाली होती. त्यामुळे या कक्षाने अत्याधुनिक तांत्रिक यंत्रणेद्वारे या तरुणाचा शोध घेतला. तो शुक्रवारी सकाळी गोव्यात आला होता व हरमल येथील एका गेस्ट हाऊसमध्ये उतरला होता. तेथे त्याला पकडण्यात आले.