Vishwajit Rane Bungalow Protest  
गोवा

Vishwajit Rane Bungalow Protest | गोव्यात जनक्षोभ उसळला! मंत्री विश्वजित राणे यांच्या बंगल्यावर आंदोलकांची धडक

Vishwajit Rane Bungalow Protest | कलम ३९ (अ) विरोधातील जनक्षोभ आज चौथ्या दिवशी तीव्र झाल्याचे पाहायला मिळाले.

पुढारी वृत्तसेवा

कलम ३९ (अ) विरोधात पणजीत जनक्षोभ

नगर नियोजन मंत्री विश्वजित राणेंच्या बंगल्यावर आंदोलकांची धडक

बंगल्याबाहेर आंदोलकांचा ठिय्या,मंत्री राणेंच्या विरोधात घोषणाबाजी

आंदोलकांची पोलिसांच्या हातावर तुरी

आंदोलक आक्रमक, पोलिस हतबल झाल्याचे चित्र

पणजी:पुढारी वृत्तसेवा

कलम ३९ (अ) विरोधातील जनक्षोभ आज चौथ्या दिवशी तीव्र झाल्याचे पाहायला मिळाले.आंदोलकांनी थेट नगर नियोजन मंत्री विश्वजित राणे यांच्या बंगल्यावर धडक दिली. रात्री उशिरापर्यंत त्यांनी बंगल्याबाहेर ठिय्या ठरला होता.मंत्री राणे यांच्या विरोधात जोरात घोषणाबाजी सुरू होती. पणजीतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या महाआंदोलनाने अचानक वळण घेतले.

आंदोलकांनी मैदानावर न बसता नगर नियोजन मंत्री विश्वजित राणे यांच्या दोना पावला येथील बंगल्यावर मोर्चा नेण्याचा निर्णय घेतला.पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न केला.मात्र, तो निष्फळ ठरला.यावेळी आंदोलक आक्रमक झाल्याचे व पोलिस हतबल झाल्याचे दिसले.आंदोलकांनी अचानक बदललेल्या निर्णयाने आंदोलकांना अडवण्यासाठी पोलिस कुमक कमी पडली.बऱ्याच कालावधीनंतर दोना पावला (करंझाळे ) जंक्शनवर पोलिसांच्या अनेक तुकड्या पोचल्या.

नगर नियोजन कायद्यातील कलम ३९ (अ) रद्द करण्याच्या मागणीसाठी पाळे - शिरदोण येथील ग्रामस्थांचे आंदोलन तीन दिवस सुरू आहे.त्यांचे नेतृत्व करणारे आमदार विरेश बोरकर यांची तीन दिवसांच्या उपोषणामुळे प्रकृती खालावली आहे.

सुरुवातीला नगर नियोजनाच्या कार्यालयात सुरू असलेले आंदोलन पोलिसी बळाचा वापर केल्यानंतर आझाद मैदानावर सुरू होते.त्या आंदोलनाचे रूपांतर आज,सोमवारी महाआंदोलनात झाले.मात्र,सायंकाळी अचानक आंदोलकांनी आपला मोर्चा नगर नियोजन मंत्री विश्वजित राणे यांच्या दोना पावला येथील बंगल्यावर नेण्याची घोषणा केली आणि लगेचच सगळे आंदोलक दोना पावलाकडे जाण्यास निघाले.

आमदार बोरकर यांना विश्रांतीसाठी आझाद मैदानावर ठेऊन आंदोलक मंत्री राणे यांच्या बंगल्याकडे निघाले.विरोधी पक्षनेते युरी आलेमाव,आमदार एल्टन डिकोस्टा, वेंझी व्हिएगस, आरजीचे मनोज परब यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.आझाद मैदानावर आंदोलकांसोबत असलेल्या गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी मात्र मंत्री राणे यांच्या बंगल्यावर जाण्यास नकार दिला.याबाबत युरी आलेमाव यांना पत्रकारांनी विचारले असता, आलेमाव यांनी त्याबाबत बोलण्यास नकार देत लोक जिथे असतील , तिथे मी आहे असे सांगितले.

आझाद मैदानातून आंदोलक डी बी बांदोडकर रस्त्यावरून निघाले. पोलिस मुख्यालयासमोर पोलिस अधिकाऱ्यांनी येऊन युरी आलेमाव यांना तुम्ही बंगल्यावर जाऊ नका,त्याची तुम्हाला परवानगी नाही, असे सांगितले.मात्र ,पोलिसांचे कडे तोडून आंदोलक पुढे सरकले. मिरामारला जाईपर्यंत आणखी दोनवेळा पोलिसांनी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला.

मिरामार येथे रस्त्यात बस उभी करून आंदोलकांना अडवण्याचा पोलिसांचा उद्देश होता.मात्र,आंदोलकांनी पोलिसांना चकवा देत मधल्या वाटेने मिरामार समुद्र किनाऱ्यावरून करंजाळे जंक्शन गाठले.

तिथे मोठा पोलिस फौजफाटा उभा करून पोलिसांनी आंदोलकांना रोखले.तरीही पुन्हा एकदा पोलिसांच्या हातावर तुरी देत बाजूच्या वस्तीतून वाट काढत आंदोलक मंत्री राणे यांच्या बंगल्यापर्यंत पोचले.पोलिसांनी घातलेले बॅरिकेड्स आणि पोलिसांचे कडे तोडण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला.यात पोलिस आणि आंदोलक यांच्यात झटपटही झाली.

जमिनीचे रूपांतरण करणाऱ्या वादग्रस्त कलम ''३९ ए'' विरोधात हे महाआंदोलन पुकारण्यात आले होते. पाळे-शिरदोण येथील झोन बदल मागे घेण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आज राज्यस्तरीय स्वरूप प्राप्त झाले .

विरोधकांच्या ११ बसेस अडवल्या अन् सोडल्या

आप आमदार वेंझी व्हिएगस, क्रूज सिल्वा यांच्या मतदारसंघांतील नागरिकांना आझाद मैदानावर घेऊन येणाऱ्या ११ बसेस पोलिसांनी वाटेत अडवल्या.मात्र, आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर त्यांच्या बसेस सोडण्यात आल्या. काँग्रेस, गोवा फॉरवर्डच्या आमदारांच्या मतदारसंघांतूनही नागरिकांना आंदोलनस्थळी आणण्यासाठी बसेसचे आयोजन करण्यात आले होते.

भाजप सरकारची कृती निषेधार्ह

भाजप सरकारने आज हे सिद्ध केले आहे की, ते भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हिरावून घेऊ इच्छितात. गोव्याचे रक्षण करण्यासाठी लोक टीसीपीच्या कलम ३९ अ ला विरोध करण्यासाठी आझाद मैदानावर गर्दी करतील या भीतीने, भाजप सरकारने आपल्या लोकांना रोखण्यासाठी आणि धमकावण्यासाठी यंत्रसामुग्री व बळाचा वापर केला आणि आंदोलकांना पणजीकडे येण्यापासून रोखले. हे निषेधार्ह आहे.राज्याच्या संपत्तीची लूट करण्यासाठी लोकांना त्रास देणाऱ्या भाजपच्या भ्रष्ट सरकारला लोकच धडा शिकवतील, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले.

मंत्री राणेंनी आंदोलकांशी बोलावे

आमदार वेंझी व्हिएगस म्हणाले की, मंत्री विश्वजित राणे यांनी बंगल्याबाहेर येऊन आंदोलकांना संबोधित करावे, कारण लोक चिंतेत आहेत. जर मंत्री राणे त्यांना आश्वासन देण्यासाठी पुढे आले नाहीत, तर परिस्थिती गंभीर होऊन नियंत्रणाबाहेर जाऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT