मडगाव- सुभाष वेलिंगकरांच्या अटकेची मागणी करत जमाव पुन्हा रस्त्यावर उतरला आहे.  (Pudhari Photo)
गोवा

सुभाष वेलिंगकर यांच्या अटकेची मागणी, मडगावातील आंदोलनाला हिंसक वळण

पुढारी वृत्तसेवा

मडगाव; पुढारी वृत्तसेवा : प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या अटकेसाठी मडगावात सुरु असलेले आंदोलन तीव्र झाले आहे. कोलवा सर्कलजवळ जमलेल्या आंदोलकांनी शहरात येणाऱ्या वाहतुकीबरोबर, कोलवा आणि रवींद्र भवन सर्कल अडवून दक्षिण गोव्यातील जनतेला वेठीस धरले. जमावाने आपल्या घरी जाऊ पहाणाऱ्या दुचाकीस्वाराला त्याचेच हेल्मेट त्याच्या डोकीवर मारुन त्याला जखमी केल्याची घटना घडली. या जमावावर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही हे उघड झाले आहे. जिल्हा इस्पितळात जाणारे रुग्ण, आरोग्य केंद्रातून गंभीर स्वरूपाच्या रूग्णांना घेऊन आलेल्या रुग्णवाहिका आणि बाजारासाठी आलेल्या लोकांना अडवून या आंदोलनकांनी कायदा हाती घेतला आहे.

आज (शनिवार) जमाव वेलिंगकर यांच्या अटकेची मागणी करत पुन्हा रस्त्यावर आला. प्रतिमा कुटिनो यांच्या नेतृत्‍वातील सर्वजण सकाळी कोलवा सर्कलजवळ जमा झाले होते. साडेदहा वाजण्याच्या सुमारास कोलवा सर्कलवरील वाहतूक अडवण्यात आली. पोलिसांनी चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून सुमारे पाचशे लोकांनी कोलवा सर्कलवर एकत्र येऊन कदंब बस स्थानकावरून शहरात येणारी वाहतूक अडवून धरली.

या वाहतुकीत उत्तर गोव्यातून तसेच दाबोळी विमानतळावरुन दक्षिण गोव्यात येणाऱ्या पर्यटकांचा समावेश होता. रवींद्र भवनचा मार्ग अडवला गेला. कोलवाला जाणारी वाहतूक सुद्धा अडवली गेली. केटीसीच्या बाजूने जिल्हा इस्पितळात जाणारी रुग्णवाहीका सुद्धा अडवली गेली. युवक आपल्या दुचाकीने कोलवा सर्कल पार करुन घरी जाण्याच्या प्रयत्नात होता. त्याला मोर्चात सहभागी हो असे सांगण्यात आले. त्याने मला लवकर घरी पोचायचे आहे असे सांगुन दुचाकी पुढे नेण्याचा प्रयत्न केला असता त्याला अडवून त्याचे हेल्मेट काढण्यात आले आणि त्याला त्याच हेल्मेटने मारहाण करण्यात आली. या घटनेचे गंभीर पडसाद दक्षिण गोव्यात उमटू लागले असुन त्या युवकाच्या मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमावर पसरल्यानंतर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT