पणजी : खारफुटीशी संबंधित 3500 सर्वेक्षण क्रमांकांना संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर करावे, असे निर्देश वनमंत्री विश्वजित राणे यांनी वन विभागाला दिले आहे. त्यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केले आहे.
गोव्याच्या किनारपट्टीवर पर्यावरणीय समतोल राखण्यात मॅन्ग्रोव्ह (खारफुटी) परिसंस्था फार महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे या परिसंस्थेचे जतन आणि संरक्षण हे अत्यंत आवश्यक असल्याचे मत मंत्री राणे यांनी व्यक्त केले आहे.ते म्हणाले, राज्यातील सुमारे 3,500 मॅन्ग्रोव्ह संलग्न सर्वेक्षण क्रमांकांची सविस्तर पाहणी करण्यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक (पीसीसीएफ) यांच्या अधिपत्याखाली वन विभागाला आदेश दिले आहेत. या क्रमांकांची निश्चिती करून त्यांना संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया तातडीने हाती घेण्यात यावी, अशी सूचना त्यांनी केली आहे. या सर्वेक्षणाच्या आधारे एक सखोल आणि सर्वसमावेशक अहवाल तयार करण्यात यावा. तसेच मॅन्ग्रोव्ह क्षेत्रांमध्ये कुठल्याही प्रकारचे अतिक्रमण किंवा अनधिकृत बांधकाम आढळल्यास त्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही.
गोवा राज्यातील जैवविविधता व किनारपट्टीची सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी ही पावले उचलली जात असल्याचेही राणे यांनी नमूद केले. मॅन्ग्रोव्ह परिसंस्था हे आपले निसर्गसंपदेचे रक्षण करणारे कवच आहे. त्याचे रक्षण ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असेही मंत्री राणे यांनी आपल्या ‘ट्विट’वर म्हटले आहे.