पणजी : काश्मीरमध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा भ्याड हल्ला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाहीत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. ताळगाव येथे आयोजित मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, आमदार जेनिफर मोन्सेरात, मंडल अध्यक्ष विवेक भंडारी, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर, पुंडलिक राऊत यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, देश आता भक्कम नेतृत्वाच्या हातात आहे. काश्मीरमध्ये झालेला हल्ला हा भारतीयांवरचा हल्ला होता. त्यामुळे पंतप्रधान त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाहीत. देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास आपणास सर्वांना माहीत आहे. देशाचे दोन तुकडे झाले, त्या वेळेला अनेक भारतीयांच्या कत्तली करण्यात आल्या, त्यांचे मृतदेह रेल्वेने भरून पाठवण्यात आले. आता देश बदललेला आहे. पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत देश सोडण्याचा आदेश दिला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू आहे. सिंधू पाणी करार रद्द करण्यात आला असून दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
मुस्लिम, ख्रिश्चन आनंदाने एकत्रित नांदत आहेत. मात्र काही लोकांना ते नको आहे. पंतप्रधान मोदी वर्तमानापेक्षा भविष्याचा विचार करतात. म्हणूनच त्यांनी 2047 च्या विकसित भारताची संकल्पना मांडली आहे. आणि त्यासाठी आपल्याला सर्वांना काम करावे लागणार आहे. राज्यात विविध पातळीवर काम सुरू असून इथल्या तरुणांच्या हाताला काम मिळेल, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. आवश्यक ते स्किल येण्याकरता राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले, पक्षासाठी विधानसभा निवडणूक महत्त्वाची आहेच. पण त्यापूर्वीच्या जिल्हा पंचायती, महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणुकाही महत्त्वाच्या आहेत. त्या जिंकसाठी स्थानिक पातळीवर काम करणे गरजेचे आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ताळगावसह गोव्याचा चौफेर विकास केला आहे. झुआरी नदीवरील पूल, मोप विमानतळ, आयुष इस्पितळ असे अनेक प्रकल्प मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात पूर्ण झाले आहेत. युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी ‘मुख्यमंत्री कौशल्य योजना’ तसेच इतर उपक्रमही सुरू झाले आहेत. डबल इंजिन सरकारच्या कार्यकाळात गोव्यासह देशाचा झपाट्याने विकास होत आहे. ताळगाव मतदारसंघात 13.20 कोटी रुपये खर्चून रस्ते हॉटमिक्स करण्यात आले आहेत. यामुळे पुढील कार्यकाळातही तेच मुख्यमंत्री असायला हवेत, असे आमदार जेनिफर मोन्सेरात म्हणाल्या.