पणजी; पुढारी वृत्तसेवा : गोव्यात पहिल्यांदाच होणार्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमुळे गोवेकरांचे अनेक वर्षाचे स्वप्न सत्यात येत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 26 ऑक्टोबररोजी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. असे असले तरी क्रीडा स्पर्धा 19 तारखेपासून सुरू होत आहेत. आज (दि.17) गोव्यात 156 खेळाडूंचे दाखल होणार आहे. 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी दिली.
यावेळी बोलताना मंत्री गावडे यांनी सांगितले की, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची तयारी 100 टक्के झालेली आहे. दि. 19 ऑक्टोबरपासून क्रीडा स्पर्धा सुरू होत असून बांबोळी येथील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये बॅडमिंटनची स्पर्धा सुरू होणार आहे.
पेडे येथील मैदानावर दि. 27 ऑक्टोबररोजी स्पर्धा होणार आहे. त्या मैदानाचे कामही पूर्ण झाले असून आम्ही ते मैदान भारतीय ऑलिम्पिक संघटनेला सुपूर्त केले आहे, अशी माहिती गावडे यांनी दिली. क्रीडा खात्याचे अधिकारी रात्री जागून तयारी करत असल्याचेही मंत्री तावडे यांनी सांगितले.
राज्यातील 28 ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. कांपाल येथील क्रीडानगरी ही वेगळ्या पद्धतीने उभी केली जात असून या दोन-तीन दिवसांमध्ये या क्रीडानगरीचे काम पूर्ण होणार आहे. अतिथी देवो भव ही आम्हा भारतीयांची संकल्पना आहे. त्यानुसार गोव्यात येणार्या सर्वांचा गोवेकरांनी सन्मान करावा, असे आवाहन यावेळी गावडे यांनी केले.
विविध राज्यांचे 156 खेळाडू आज मंगळवारी दाबोळी येथे विमानाने आणि कोकण रेल्वेने मडगाव येथे दाखल होत आहेत. त्या सर्वांचे गोवा राज्य सरकारतर्फे आपण स्वागत करणार असल्याचे मंत्री गावडे यांनी सांगितले.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा प्रत्यक्ष दि. 19 पासून सुरू होत असल्या तरी, पणजी शहराजवळील स्पर्धा या दि. २५ नंतर सुरू होणार आहेत. त्यामुळे पणजी शहरांमध्ये सुरू असलेली स्मार्ट सिटीची कामे दि. 25 नंतर थांबविण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती गावडे यांनी दिली.
हेही वाचा :