पणजी : मुलाच्या सक्रिय क्रिकेट कारकिर्दीमुळे निर्माण झालेला हितसंबंधांचा संघर्ष टाळता येण्यासारखा नसल्याचे नमूद करत गोवा क्रिकेट असोसिएशनचे (जीसीए) नैतिकता अधिकारी तथा लोकपालांनी व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रशांत काकोडे यांना तत्काळ निलंबित केले आहे. मात्र, त्यांचा मुलगा मनीष काकोडे याला ‘जीसीए’च्या संघ निवडीतून वगळण्याची मागणी लोकपालांनी फेटाळून लावली.
मनीषविरुद्ध गैरप्रकार, अनुचित निवड किंवा गुणवत्तेचा अभाव असल्याचे कोणतेही निष्कर्ष नोंदवण्यात आलेले नाहीत. माजी क्रिकेटपटू सुदिन विनायक कामत यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर ही कारवाई करण्यात आली.
काकोडे यांच्या मुलाने गोव्याच्या २३ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर त्याचा रणजी चषक शिबिरात समावेश झाला. त्याचवेळी प्रशांत काकोडे हे ‘जीसीए’च्या व्यवस्थापन समितीवर मतदानाचा अधिकार असलेले सदस्य होते. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) हितसंबंध संघर्षासंबंधी नियमांचा भंग झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. दरम्यान, तक्रारदार सुदिन विनायक कामत यांनी मनीष काकोडे याला ‘जीसीए’ संघ निवडीतून वगळण्याची केलेली मागणी लोकपालांनी स्पष्टपणे फेटाळली.