पणजी : पुढारी वृत्तसेवा
निवडणुकांपूर्वी संभ्रम, अफवा आणि फेक नॅरेटिव्ह पसरवून जिंकण्याचा प्रयत्न काँग्रेस व इतर विरोधी पक्ष करत आहेत. अशा प्रकारे निवडणुका जिंकता येत नाहीत. त्यासाठी तळागाळात जाऊन सर्वसामान्यांसाठी काम करावे लागते, अशी टीका मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. पणजी येथे सोमवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, मतदार आता शहाणे झाले असून कोण काय करतो, कोण अफवा पसरवतो, दिशाभूल करतो, याची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे काँग्रेस विविध निवडणुकांत पराभूत होत आहे. निवडणुका जवळ आल्यानंतर वारंवार खोटे बोलून ते खरे भासवण्याचा प्रयत्न काँग्रेसने सोडून द्यावा. लोकांसाठी प्रत्यक्ष काम केल्यासच त्यांना जनतेचा पाठिंबा मिळेल, असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, ईव्हीएमवर काँग्रेसकडून पूर्वी आरोप केले जात होते. मात्र, हिमाचल प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि केरळमध्ये काँग्रेस ईव्हीएमवरच विजयी झाली. आता एसआयआरवर टीका करून मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
एसआयआरच्या प्रक्रियेत अपात्र व दुहेरी नोंदी वगळल्या जातात. पात्र मतदाराचे नाव वगळले गेले असल्यास फॉर्म ६ भरून पुन्हा नाव नोंदवण्याची संधी आहे. काँग्रेसने यासाठी प्रयत्न करण्याऐवजी दिशाभूल करून अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असा आरोप त्यांनी केला.
निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय आणि अन्य संविधानिक संस्थांवर काँग्रेसकडून वारंवार आरोप केले जात असल्याचे सावंत म्हणाले. भारतीय निवडणूक आयोगाच्या तिन्ही आयुक्तांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन एसआयआरसंदर्भातील आदेशांबाबत आपल्यात कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या आरोपांतील खोटेपणा उघड झाल्याचा दावा त्यांनी केला.
राज्यातील अल्पसंख्याक नागरिकांची नावे मतदार याजीतून गाळलेली नसून काही नागरिकांकडे दुहेरी नागरिकत्व असल्यामुळे त्यांना फॉर्म ६ भरला नसावा. पात्र नागरिकांना अद्याप फॉर्म ६ भरण्याची संधी असल्याचेही सावंत यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात भ्रष्टाचारविरहित सरकार देतानाच विकासकामे झाली असून गोव्यातही डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकल्प उभे राहिल्याचे सावंत म्हणाले. विकासकामे करून मतदारांचा विश्वास संपादन करावा लागतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
लोकांसाठी काम केल्यावरच जनतेचा मिळतो पाठिंबा
...तर पुन्हा नाव नोंदवण्याची संधी
मतपत्रिकेवरही काँग्रेसचा पराभव...
ईव्हीएमवर अविश्वास व्यक्त करणारी काँग्रेस राज्यात जि. पं. निवडणुका मतपत्रिकेवर झाल्या, त्यातही पराभूत झाली. आरोप करण्यापेक्षा मतदारांना विकासकामे दिसणे आणि काम पटणे महत्त्वाचे आहे, असे सावंत म्हणाले.