पणजी : पुढारी वृत्तसेवा
केंद्र सरकारच्या अनेक योजनांमधून रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी कठोर परिश्रम करण्याची गरज आहे. नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान व संशोधन आणण्याची गरज आहे. एआय व्हॉट्सॲप चॅटबॉटच्या मदतीने केंद्र व राज्य सरकारच्या सर्व सेवा ऑनलाईन उपलब्ध आहेत. सरकारी नोकरीची प्रतीक्षा करण्यापेक्षा नोकऱ्या देणारे बना, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
दोनापावल येथील लोकभवनमध्ये माहिती तंत्रज्ञान व शिक्षण खात्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या सेवा संकल्प अभियान या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे, आमदार गोविंद गावडे, माहिती तंत्रज्ञान सचिव संतोष सुखदेव, शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, माहिती तंत्रज्ञान संचालक कबीर शिरगावकर व उच्च शिक्षण संचालक भूषण सावईकर, तसेच स्नेहा भागवत उपस्थित होत्या.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, देशात ३०० हून अधिक तर गोव्यात सुमारे २८० ऑनलाईन सेवा उपलब्ध आहेत. यावेळी एआय व्हॉट्सॲप चॅटबॉट ऑनलाईन सेवेचे उद्घाटन झाले. या विविध सेवांसाठी सरकारी कार्यालयांमध्ये येण्याची गरज नाही. त्याचा फायदा नागरिकांनी, तसेच युवा पिढीने घ्यावा.
आयुर एकोथॉन कार्यक्रम सुमारे १८० देशांमध्ये तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पोहोचण्याचे कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पर्यटन, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांत रोजगाराच्या संधी आहेत.
मात्र त्या मिळवण्यासाठी युवा पिढीने प्रयत्न करण्याची गरज आहे. सेवा संकल्प अभियानातून ही परंपरा पुढे नेण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करू शकतो. ते म्हणाले, पर्यटन क्षेत्रात अनेक संधी आहेत. मात्र गोमंतकीय पुढे येत नाहीत. त्यामुळे परप्रांतीय या क्षेत्रात असलेल्या रोजगाराच्या संधी बळकावत आहेत.
शिक्षण व माहिती तंत्रज्ञान खाते नवनवीन कल्पना पुढे आणत आहे, त्याचा फायदा युवा पिढीने उठवण्याची गरज आहे. स्पर्धात्मक परीक्षांना सामोरे जायला हवे. त्यासाठी कठोर परिश्रम करण्याची तयार ठेवायला हवी. परिश्रमाशिवाय काहीच साध्य होत नाही, असेही त्यांनी नमूद केले.
काँग्रेसच्या राखण यात्रेवर निशाणा
गोवा राखण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची नव्हे तर त्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान व संशोधनाची गरज आहे. विकसित गोवा करण्यासाठी गोव्याचा आजचा युवा वर्ग सक्षम आहे, असा टोला यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काँग्रेसच्या सध्या सुरू असलेल्या गोवा राखण यात्रा संदर्भात हाणला.