पणजी : गोव्याचे रक्षण आणि विकास करण्यास भाजप सक्षम असल्याचे गेल्या १४ वर्षांत आम्ही दाखवून दिले आहे. केंद्र आणि राज्यातील 'डबल इंजीन' सरकारने गोव्याचे रक्षण करताना विकासही साधला आहे. त्यामुळे काँग्रेसने 'गोवा राखण यात्रा' काढली तरी त्याचा भाजपच्या मतदारांवर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला.
भाजपच्या अटल भवनमध्ये पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी भाजपच्या ई-लायब्ररीचे उद्घाटनही करण्यात आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे, आमदार राजेश फळदेसाई, आमदार रुडाल्फ फर्नाडिस यांच्यासह पक्षाचे अन्य नेते उपस्थित होते.
ई-लायब्ररीच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, भाजपच्या दिल्लीतील केंद्रीय कार्यालयातील ई-लायब्ररीशी गोव्यातील ई-लायब्ररी जोडण्यात येणार आहे. पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना या सुविधेचा वापर करता येईल. तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन सर्वसामान्य नागरिकांनाही लायब्ररीचा वापर करता येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.