Porvorim Flyover Traffic Issue 
गोवा

Porvorim Flyover | पर्वरी उड्डाणपुलावरील एन्ट्री-एक्झिट पॉईंट्स आठवडाभरात सुरू

Porvorim Flyover | उच्चस्तरीय बैठकीनंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
नव्या पर्वरी उड्डाणपुलावरील बंद केलेले एन्ट्री-एक्झिट (प्रवेश-निर्गमन) पॉईंट्स आठवडाभरात सुरू होतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत यांनी दिली. येत्या आठ दिवसांत सर्व व्यवस्था सुरळीत केली जाईल, असेही कामत यांनी उच्चस्तरीय बैठकीनंतर सांगितले.

उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर एन्ट्री-एक्झिट पॉईंट बंद केले होते. या पार्श्वभूमीवर पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी विशेष बैठक घ्यावी, अशी मागणी केली होती. त्या अनुषंगाने बैठक झाली. बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पर्यटनमंत्री खंवटे, उपसभापती जोशुआ डिसोझा, बांधकाम तसेच वाहतूक खात्याचे अधिकारी व तज्ज्ञ उपस्थित होते.

मंत्री कामत म्हणाले, उड्डाणपुलावर व अटल सेतूच्या मार्गावर वाहतूक सुरळीत करण्यासाठी तीन प्रमुख मार्ग तत्त्वतः मान्य करण्यात आले आहेत. अपघातप्रवण ठिकाणी रंबलर्स बसवणे, वेगावर नियंत्रणासाठी आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे तैनात करणे, ३०० मीटर आधीच वेगमर्यादेची पूर्वकल्पना देणारे मोठे फलक लावणे, सिग्नल बसविणे या गोष्टी केल्या जातील, असेही ते म्हणाले.

वाहतूक सुरळीत, सुरक्षित केली जाणार : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सहापदरी पर्वरी उड्डाणपुलासंदर्भात उद्भवलेल्या सर्व तांत्रिक समस्या, वाहतूक कोंडी आणि सुरक्षेचे प्रश्न यावर येत्या आठवडाभरात योग्य उपाययोजना केल्या जातील. संबंधित सर्व विभागांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले असून, लवकरच उड्डाणपुलावरील वाहतूक पूर्णपणे सुरळीत आणि सुरक्षित केली जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

मंत्री रोहन खंवटेंचा डीपीआरवरून सवाल

पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी उड्डाणपुलाच्या डीपीआरची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली. उड्डाणपुलाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणारे संबंधित अधिकारी आता सार्वजनिक बांधकाम खात्यात कार्यरत नसले तरी त्यांची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, असे मंत्री खंवटे यांनी सांगितले.

सुरक्षेच्या तरतुदी कुणीतरी हटवल्या : काब्राल

माजी सार्वजनिक बांधकाममंत्री निलेश काब्राल यांनी आराखड्याबद्दल बोलताना सांगितले की, दुचाकींच्या अॅक्सेससाठी माझा सुरुवातीपासूनच विरोध होता. सुरुवातीच्या आराखड्यात पर्वरीकरांसाठी पुलावर चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी योग्य जोडरस्ते प्रस्तावित होते व केवळ चार चाकी वाहनांसाठीच नियोजन होते. मात्र, निविदा प्रक्रियेदरम्यान किंवा त्यानंतर एन्ट्री व एक्झिट मार्ग आणि सुरक्षेच्या तरतुदी हटवण्यात आल्या. त्या कुणी हटवल्या याची मला कल्पना नाही, असे काब्राल म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT