गोवा

Goa news | पूजा नाईकला पाठवले कारागृहातून घरी

कारागृह जेलरचा कारनामा, प्रकरण दडपण्याचा प्रकार

पुढारी वृत्तसेवा

पणजी : कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृह हे नेहमीच चर्चेत राहिले आहे. ड्रग्ज तस्करी, कैद्यांच्या गटात हाणामारी ही प्रकरणे सातत्याने घडत असतात. सरकारी नोकरीत कोट्यवधींच्या घोटाळ्यातील संशयित पूजा ही अनेक प्रकरणांमध्ये कोठडीत आहे. एका प्रकरणात तिला जामीन मिळाल्यानंतर कारागृह जेलरने इतर प्रकरणांची शहानिशा न करता तिला सोडून दिल्याचा कारनामा समोर आला आहे. हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित जेलरविरुद्ध कारवाई न करता दडपून ठेवला आहे.

कारागृहातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील गाजलेल्या सरकारी नोकरी घोटाळाप्रकरणी पूजा नाईक हिला जामीन मिळाला होता. ती इतर प्रकरणांमध्येही न्यायालयीन कोठडीत आहे. त्या दिवशी कारागृहात कर्तव्यावर (ड्युटीवर) असलेले मुकुंद गावस यांनी तिच्या इतर प्रकरणांची स्थिती न तपासताच कारागृहातून घरी जाण्यास दिले. ती कारागृहातून घरी गेली. संध्याकाळी कारागृहातील कैद्यांची मोजणी झाली तेव्हा एक महिला कैदी नसल्याचे उघडकीस आले. त्यामुळे शोधाशोध झाल्यावर कळले की संशयित पूजा नाईक हिला कोठडीतून घरी पाठवल्याची नोंद रजिस्टरमध्ये होती.

ही चूक लक्षात येताच कारागृह अधीक्षकांनी जेलरला फैलावर घेतले. संशयित पूजा नाईक ही २४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ४.३० वा. कारागृहातून बाहेर गेलेली व २५ फेब्रुवारी दुपारी २ वा. कारागृह प्रवेशद्वारावर आली. तिला तेथे बसवून ठेवण्यात आले. नोंदणी रजिस्टरमध्ये फेरफार करून तिला संध्याकाळी ५ वा. आतमध्ये घेण्यात आले.

संशयित पूजा नाईक हिला दुसऱ्या दिवशी पहाटे संपर्क साधण्यात आला व तिला तत्काळ कोलवाळ कारागृहात येण्यास सांगितले. ती दुसऱ्या दिवशी कारागृहात पोहोचली तेव्हा तिला जामीन मिळाला असला तरी इतर प्रकरणात तिची न्यायालयीन कोठडी अजूनही सुरू असल्याने सुटका झालेली नाही. हा सर्व प्रकार कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला. या जेलरने केलेल्या कारनाम्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. जेलर मुकुंद गावस याचे कारागृहातील काम संशयास्पद असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना तो कथितरित्या मद्यनशेत सापडला असतानाही काहीच कारवाई झालेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT