पणजी : फोंडा पोटनिवडणुकीच्या मतदानाला एक दिवस असताना आज (दि.८) मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने ही निवडणूक रद्द करण्याचा महत्वाचा व ऐतिहासिक निवाडा दिला आहे. त्यामुळे उद्या ९ एप्रिल रोजी होणारे मतदान होणार नाही. या महत्वाच्या निवाड्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उमेदवारांसह पक्षाच्या नेत्यांनी तसेच आमदार - मंत्र्यांनी प्रचारासाठी केलेल्या मेहनतीवर पाणी फेरले आहे. या निवाड्याकडे गोव्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले होते.
या पोटनिवडणुकीला आव्हान दिलेल्या याचिकेवरील सुनावणी गेल्या गुरुवारी २ एप्रिलला सुनावणी पूर्ण होऊन उच्च न्यायालयाने निवाडा राखून ठेवला होता. उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी याचिकादार तसेच प्रतिवाद्यांच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला होता. लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १५१ नुसार आमदारकीचा कार्यकाळ हा मतदारसंघात जागा रिक्त झाली तेव्हापासून की निवडणूक निकाल लागल्यापासून गृहित धरायचा यावर हा निर्णय होणार आहे.
आगामी विधानसभा होण्यापूर्वी रिक्त झालेल्या मतदारसंघातील आमदारकीचा कार्यकाळ किमान एक वर्षाचा असवा असा दावा याचिकादारांनी केला होता. तर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वकिलांनी तो कार्यकाळ रिक्त झालेल्या दिवसांपासून पकडण्यात येतो असा युक्तिवाद केला होता. उच्च न्यायालयाचा हा निवाडा अशा प्रकरणामध्ये सर्व राज्यांना लागू होणार आहे.