पणजी : पुढारी वृत्तसेवा
माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान सरकारमध्ये मंत्री राहिलेले रवी नाईक यांच्या अकाली निधनामुळे फोंडा मतदारसंघामध्ये सध्या आमदार नाही. तसे पाहता फोंडा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली होती. मात्र पुढील विधानसभा निवडणुकीला सात महिन्यांपेक्षा कमी काळ असल्याने न्यायालयाने ही निवडणूक रद्द केली.
दुसरीकडे ताळगावच्या आमदार व माजी मंत्री जेनिफर मोन्सेरात यांचे रविवारी निधन झाले असल्याने ताळगावलाही सध्या आमदार नाही. येथेही सध्या पोटनिवडणूक होणार नाही. या दोन ज्येष्ठ आमदारांच्या निधनामुळे येत्या निवडणुकीनंतर फोंडा व ताळगाव या दोन्ही मतदारसंघांमध्ये नवीन आमदार मिळण्याची शक्यता आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच दोन विधानसभा मतदारसंघ रिक्त झाले आहेत.
दोन्ही जागी अनुक्रमे नगरसेवक रितेश नाईक व पणजी महापालिकेचे महापौर रोहित मोन्सेरात या दिवंगत आमदारांच्या पुत्रांना उमेदवारी मिळण्याची व हे दोन्ही युवा नवे आमदार म्हणून दोन्ही मतदारसंघातून निवडून येण्याची शक्यता आहे.
हे दोन्ही मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असल्याने रितेश नाईक व रोहित मोन्सेरात यांना भाजपची उमेदवारी मिळणार आहे. ते दोघे निवडून आले तर भाजपला व दोन्ही मतदारसंघाला नवे आमदार मिळतील.
दोन्ही मतदारसंघात सध्या आमदार नाहीत. त्यामुळे फोंडा मतदारसंघाची जबाबदारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वीकारली असून, महिन्यातून एकदा ते तिथे जाऊन लोकांची गाऱ्हाणी ऐकत आहेत. ताळगाव मतदारसंघाची जबाबदारी हे पणजीचे आमदार आणि महसूल मंत्री बाबूल मोन्सेरात यांच्याकडे राहील.
सध्या भाजप व मगोची युती आहे. प्रियूळ व मांद्रे मतदारसंघांवरून दोन्ही पक्षांत निवडणुकीवेळी वाद होण्याची शक्यता आहे.
युती तुटली तर फोंडा मतदारसंघात मगोचा उमेदवार ठेवला जाईल. ज्येष्ठ नेते व विद्यमान वीजमंत्री सुदिन ढवळीकर हे फोंड्यात उभे राहिले तर रवी पुत्र रितेश नाईक यांना संघर्ष करावा लागेल. ताळगावमध्ये मात्र रोहित मोन्सेरात हे सहज निवडून येतील.