पणजी : श्री संस्थान गोकर्ण जीवोत्तम मठ पर्तगाळीच्या सार्ध पंचशतमहोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (दि. 28) गोव्यात येत आहेत. पर्तगाळी मठ परिसरात उभारलेल्या 77 फूट उंच श्रीरामांच्या मूर्तीचे व अन्य सुशोभीकरण कामाचे ते अनावरण करणार आहेत.
मठाच्या 550 व्या वर्षांचे औचित्य साधून मठात गुरुवारपासून 11 दिवसांचा भव्य सोहळा सुरू झाला असून, तो 7 डिसेंबरपर्यंत सुरू राहील. श्री रामाच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण एक ऐतिहासिक टप्पा असून गोव्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. तामिळनाडू येथील शिल्पकाराने कांस्य धातूने श्रीरामांची मूर्ती बनवली आहे. पर्तगाळी मठ परिसरात 10 हजार चौ. फूट क्षेत्रफळात रामायणावर थीम पार्क तयार करण्यात आले असून, भगवान रामांच्या आदर्शांचे दर्शन घडवणारे संग्रहालय तयार करण्यात आले आहे. मठाचे मठाधिपती प. पू. श्रीमद् विद्याधीश तीर्थ वडेर स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा मठ संस्थानचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे यांच्या समितीच्या देखरेखेखाली सर्व कार्यक्रम होणार आहेत. या सोहळ्याला दि. 4 डिसेंबर रोजी चित्रापूर मठाचे मठाधिपती व दि.5 रोजी कवळे मठाचे मठाधिपती उपस्थिती लावणार आहे.
आमदार मैथिली ठाकूर यांचे गायन
बिहारच्या निवडणुकीत निवडून आलेल्या सर्वात युवा आमदार व गायिका मैथिली ठाकूर यांच्या गायनाचा कार्यक्रम पर्तगाळी येथे 6 डिसेंबर रोजी होणार आहे. 30 रोजी शंकर महादेवन यांचा कार्यक्रम आहे. 5 डिसेंबर रोजी संतूरवादक निलाद्री कुमार यांचा कार्यक्रम, 7 रोजी महेश काळे यांचा गायनाचा क ार्यक्रम होणार आहे.