पणजी : गेल्या अनेक दिवसांपासून कला अकादमीतील तांत्रिक बाबींवरून गोंधळ सुरू आहे. अशातच रविवारी भरत जाधव निर्मिती प्रस्तुत ‘श्रीमंत दामोदरपंत’ नाटकाचा प्रयोग होता. नाटकाच्या सुरुवातीला सभागृहातील वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याचे कारण देत काही प्रेक्षकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही वेळानंतर यंत्रणा सुरळीत झाल्यानंतर नाट्यप्रयोग नीट पार पडला.
प्रेक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, नाटक सुरू होण्यापूर्वी जेव्हा प्रेक्षक सभागृहात येत होते, तेव्हा काही प्रमाणात वातानुकूलित यंत्रणा कमी होती. सभागृहाची दारे खुली असल्याने यंत्रणा कमी करण्यात आली होती. मात्र, उष्णता जाणवत असल्याचे कारण सांगत काही प्रेक्षकांनी गोंधळास सुरुवात केली. सभागृहात अचानक झालेल्या या गोंधळाने सर्वच प्रेक्षक बुचकळ्यात पडले. ‘अकादमीची यंत्रणा नीट नाही, आमचे पैसे वाया गेले, एसी पूर्ववत करा’, असे ओरडत एक इसम रंगमंचाजवळ जाऊन व्यवस्थापनाशी वाद घालू लागला. त्यानंतर व्यवस्थापनाने वातानुकूलित यंत्रणा पूर्ववत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे नाटक सुरू होण्यास थोडा विलंब झाला. मात्र, त्यानंतर संपूर्ण नाट्य प्रयोग सुरळीत पार पडला. मात्र तोवर ही गोष्ट वार्यासारखी सर्वत्र पसरली आणि समाज माध्यमांवर कलाकारांचे कला अकादमीच्या यंत्रणेत त्रुटी असल्याचे संदेश वायरल होऊ लागले. मागील काही दिवसांपूर्वी ‘पुरुष’ या नाटकावेळी सभागृहात प्रकाश योजनेमध्ये झालेल्या गोंधळामुळे नाटक अर्ध्यात थांबवण्यात आले होते. लगेच आठवड्याभरात दुसरा गोंधळ झाल्याचे बोलले जात असल्याने यात अधिकच भर पडली.
कला अकादमीतील तांत्रिक बाबींवरून ज्या काही गोष्टी सुरू आहेत, त्या सर्व मुख्यमंत्र्यांना माहीत असून मी त्यांच्याशी चर्चा केली आहे. लवकरच ते याबाबत बैठक घेतील. मी माझे काम प्रामाणिकपणे करत असून जनतेलाही ते ठाऊक आहे. तरीही याबाबत कोणाला समस्या असेल, तर योग्य वेळ आल्यावर मी नक्की उत्तर देईन. आता कोण राजकारण करते की नाही, यावर बोलण्यापेक्षा देव माझ्यासोबत आहे, याची मला खात्री आहे, असे मत मंत्री गोविंद गावडे यांनी व्यक्त केले.