डिचोली : पुढारी वृत्तसेवा
पिळगाव पंचायत क्षेत्रातील ग्रामसभेत नियोजित फ्लायओव्हर तसेच खनिज वाहतुकीचा प्रश्न चांगलाच गाजला. प्रस्तावित फ्लायओव्हरमुळे गावातून खनिज वाहतूक अधिक प्रमाणात आणि नियमितपणे सुरू राहण्याची शक्यता असून, त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. या फ्लायओव्हरला तीव्र विरोध असल्याचा स्पष्ट सूर ग्रामसभेत उमटला.
सध्या पिळगाव परिसरातून सुरू असलेल्या खनिज वाहतुकीमुळे ग्रामस्थांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. खनिज वाहतुकीमुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, पावसाळ्यात रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य निर्माण होते.
वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे धूळ आणि प्रदूषण वाढत असल्याने नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे पावसाळ्यात खनिज वाहतूक बंद ठेवावी, अशी मागणी करण्यात आली.
प्रस्तावित फ्लायओव्हरमुळे खनिज वाहतूक थांबण्याऐवजी ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावाच्या हिताचा विचार करून या प्रस्तावाला विरोध करणे आवश्यक असल्याची भूमिका ग्रामस्थांनी मांडली.
प्रभारी सरपंच उमाकांत परब गावकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली. यावेळी सर्व पंच सदस्य उपस्थित होते. गावातील समस्या सोडविताना ग्रामस्थांना विश्वासात घेऊन निर्णय घेतले जातील. ग्रामस्थांनी मांडलेल्या विविध प्रश्न आणि सूचनांबाबत संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे उमाकांत परब गावकर यांनी स्पष्ट केले.
ग्रामस्थांनी मांडलेल्या प्रश्नांकडे पंचायत गांभीर्याने पाहणार असून, गावाच्या हितासाठी आवश्यक त्या पातळीवर पाठपुरावा केला जाईल, असे प्रभारी सरपंच उमाकांत परब गावकर यांनी सांगितले. खनिज कंपनीशी चर्चा करून गावातील समस्या त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात येतील.
खनिज वाहतूक, प्रदूषण आणि त्यामुळे ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत पंचायतीतर्फे खनिज कंपनीला निवेदन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ग्रामस्थांनी मांडलेल्या प्रत्येक विषयाचा गांभीर्याने विचार करून संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा केला जाईल. नागरिकांना त्रास होणार नाही आणि गावाच्या हिताला बाधा येणार नाही, यासाठी पंचायत आवश्यक ती भूमिका घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.