House Pudhari
गोवा

Maza Ghar Scheme | 'माझे घर' मुळे घरांना कायदेशीर संरक्षण

Maza Ghar Scheme | आमदार प्रवीण आर्लेकर : योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचविणार

पुढारी वृत्तसेवा

पेडणे : पुढारी वृत्तसेवा

'माझे घर' योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सनद मिळाल्यामुळे त्यांच्या घरांचा कायदेशीर हक्क निश्चित झाला असून, आता त्यांना हक्काच्या घराचे संरक्षण मिळणार आहे, असे प्रतिपादन पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी केले. जनकल्याण शिबिराअंतर्गत आयोजित 'माझे घर' योजनेच्या सनद वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी पेडणे उपजिल्हाधिकारी वर्षा परब, मामलदार रणजीत साळगावकर तसेच महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात २० कलमी कार्यक्रमांतर्गत उभारण्यात आलेल्या घरांतील लाभार्थी तसेच स्वतःच्या जागेवर घरे बांधलेल्या पात्र नागरिकांना 'माझे घर' योजनेअंतर्गत सनदांचे वितरण करण्यात आले.

आमदार आर्लेकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली विविध जनकल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविल्या जात असून त्यांचा थेट लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळत आहे.

'माझे घर' योजनेमुळे अनेक कुटुंबांना त्यांच्या घराचा कायदेशीर हक्क प्राप्त होत असून ही योजना लोकहिताची आणि दिलासादायक ठरत आहे. या योजनेला काहींनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते चांगलेच तोंडघशी पडले.

त्यामुळे जनकल्याणाच्या कामांमध्ये विरोधकांनी नाहक विरोध करू नये, असेही आर्लेकर म्हणाले. यावेळी उपजिल्हाधिकारी वर्षा परब यांनी 'माझे घर' योजनेची सविस्तर माहिती देताना खासगी, सरकारी तसेच कोमुनिदाद जमिनीवरील घरांना कायदेशीर मान्यता मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि सनद मिळविण्याची कार्यपद्धती याविषयी मार्गदर्शन केले.

विविध मान्यवरांचा गौरव

कार्यक्रमात कला, साहित्य, कृषी तसेच विविध सामाजिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रवींद्र पेडणेकर, प्रसाद परब, एकनाथ सावळ देसाई, महादेव शेट्ये, दशरथ गावडे, बाबलो पेडणेकर, रुपेश सावंत, सदाशिव नाईक, विलास धारगळकर, संतोष तळवणेकर, गणवेश नागवेकर, शिवाजी महाले आणि नकुल मळीक यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT