पेडणे : पुढारी वृत्तसेवा
पेडणे तालुक्यातील कासारवर्णे येथील उमेश वर्क या युवकावर यशस्वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेले हृदय विशेष हेलिकॉप्टरद्वारे तमिळनाडूतील मदुराई येथून चेन्नई येथे आणण्यात आले होते.
19 वर्षीय अपघातग्रस्त तरुणाचे हृदय दान करण्यात आले असून, अत्यंत कमी वेळेत ते हेलिकॉप्टरने सुरक्षितपणे चेन्नईत पोहोचवण्यात आले. वेळेशी चाललेली ही शर्यत यशस्वी ठरली आणि डॉक्टरांच्या पथकाने उमेश वर्क यांच्यावर यशस्वी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पाडली.
या संपूर्ण प्रक्रियेत वैद्यकीय पथक, प्रशासन तसेच हेलिकॉप्टर सेवांचा समन्वय महत्त्वाचा ठरला. ही माहिती आमदार जीत आरोळकर यांनी दिली असून, त्यांनी दात्या कुटुंबियांचे तसेच वैद्यकीय पथकाचे कौतुक केले. या घटनेमुळे अवयवदानाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, एका तरुणाच्या दानामुळे दुसऱ्या युवकाला नवे जीवन मिळाले आहे.