म्हापसा : पुढारी वृत्तसेवा
अज्ञात चोरट्यांकडून पर्रा येथे एका घरात दरोडा घालण्याचा प्रयत्न घरातील एका युवतीच्या सतर्कतेमुळे फसला. ही घटना शनिवारी रात्री १०.३० च्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्रा येथील सदर घरातील कुटुंब एका कार्यक्रमासाठी गेले होते.
घरात फक्त त्यांची एक मुलगी होती. त्यामुळे त्यांनी बाहेरून घराला टाळे ठोकले होते. साधारण रात्री १०.३० च्या सुमारास घराच्या मागच्या बाजूच्या खिडकीची काच फोडून खिडकीचे गज कापण्याचा आवाज घरातील मुलीला आला.
चोरी करण्याचा प्रयत्न होत असल्याची शंका आल्यामुळे तिने आरडाओरडा करून शेजाऱ्यांना फोन करून कळवले. तिच्या व शेजाऱ्यांच्या आवाजामुळे चोरट्यांनी तेथून पलायन केले. चोरी करण्यासाठी आलेले संशयित चोरटे चौघेजण असावेत, त्यांनी मास्क घातले होते व ते कारने आले होते असे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून येत आहे.
म्हापसा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच पर्रा येथील नागनाथ देवस्थानात अज्ञात चोरट्याने फंड पेटी फोडून चोरी केली होती पुन्हा या देवस्थानापासून जवळच हा चोरीचा प्रकार घडला आहे. फसलेल्या या चोरीची माहिती मिळताच कळंगुट चे आमदार मायकल लोबो यांनी घटनास्थळी जाऊन त्या कुटुंबाची भेट घेतली व पाहणी केली.
त्या घरात मुलगी होती म्हणून चोरीचा हा प्रयत्न फसला अन्यथा हा दरोडा झाला असता. पोलिसांकडून भाडेकरू पडताळणी योग्य रीतीने होत नसावी. हवालदार व त्यावरील पोलिसांना हत्यारे देण्याची गरज आहे, तसेच प्रत्येक पोलीस स्थानकात आणखी आठ दहा दुचाकी देण्यात याव्यात. पकडण्यात येणाऱ्या चोरांवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.