Congress vs BJP Goa Women's Issues
पणजी : महिलांना ३३ टक्के राजकीय आरक्षण देणाऱ्या ‘नारी शक्ती वंदना’ विधेयकाला विरोध केल्याचा आरोप करत भाजप महिला मोर्चाच्या वतीने पणजी येथे काँग्रेसविरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग होता.
मोर्चापूर्वी भाजप कार्यालयासमोर आयोजित सभेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. महिलांना मिळणाऱ्या ३३ टक्के आरक्षणाला विरोध करून काँग्रेसने त्यांचा हक्क हिरावून घेतला असून हा महिलांचा अपमान असल्याचे त्यांनी सांगितले. या अन्यायाचा बदला देशातील आणि गोव्यातील महिला आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसला पराभूत करून घेतील, असा इशाराही त्यांनी दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांचा सन्मान वाढवण्यासाठी आणि राजकारणात त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी हे विधेयक आणल्याचे सांगत डॉ. सावंत यांनी केंद्र सरकारच्या महिला-केंद्रित योजनांची माहिती दिली. २०१४ नंतर केंद्राच्या अनेक योजनांना काँग्रेसने विरोध केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी ३३ टक्के आरक्षण ही महिलांसाठी मोठी संधी होती, मात्र काँग्रेसने ती नाकारल्याचे सांगितले. भाजप महिलांना योग्य प्रतिनिधित्व देण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आमदार डॉ. देविया राणे यांनी काँग्रेसला महिलांचे सशक्तीकरण मान्य नसल्याचा आरोप केला. महिलांनी जागरूक राहून काँग्रेसला निवडणुकांत धडा शिकवावा, असे आवाहन त्यांनी केले. आमदार डिलायला लोबो यांनीही विरोधकांवर टीका करत महिलांना आरक्षण देण्यास अडथळा आणल्याचे म्हटले.
महिला मोर्चा प्रभारी प्रा. सुलक्षणा सावंत यांनी विरोधकांनी नियोजनपूर्वक हे विधेयक अडविल्याचा आरोप केला. भविष्यात महिलांच्या पाठिंब्यामुळे भाजपला मोठे यश मिळेल आणि आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी महिला मोर्चा अध्यक्षा सुवर्णा तेंडुलकर, उत्तर गोवा जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा बांदोडकर, सदस्य गौरी कामत, निहारिका मांद्रेकर, कुंदा चोडणकर यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.