पणजी: गोव्याची राजधानी पणजीने स्वच्छतेच्या क्षेत्रात एक मोठा बहुमान मिळवला आहे. केंद्र सरकारच्या 'स्वच्छ सर्वेक्षण २०२४' मध्ये पणजी शहराने राष्ट्रपती पुरस्कार जिंकून देशात अव्वल स्थान पटकावले आहे. शहरवासीयांचे सहकार्य आणि महापालिकेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मिळालेले हे राष्ट्रीय स्तरावरील यश संपूर्ण गोव्यासाठी अभिमानास्पद ठरले आहे.
येत्या १७ जुलै रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या दिमाखदार सोहळ्यात, भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केला जाईल. पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात आणि आयुक्त क्लेन मडेरा शहराच्या वतीने हा सन्मान स्वीकारतील.
या यशाचे श्रेय महापौर रोहित मोन्सेरात यांनी पणजीतील नागरिक आणि महापालिका प्रशासनाच्या एकत्रित प्रयत्नांना दिले आहे. "शहर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी राबवलेल्या विविध उपक्रमांना नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच हे यश शक्य झाले," असे त्यांनी म्हटले.
केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयातर्फे 'स्वच्छ सर्वेक्षण' ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. देशभरातील शहरांच्या स्वच्छतेचे मूल्यांकन करून त्यांना क्रमवारी दिली जाते. या राष्ट्रीय सन्मानामुळे पणजीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, भविष्यात स्वच्छतेचा हा दर्जा कायम ठेवण्याचे आणि अधिक उंचावण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर असेल.