पणजी : पणजी महानगरपालिकेला राष्ट्रीय पातळीवरचा सन्मान मिळाला आहे. ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत आयोजित ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ मध्ये पणजी शहराने राष्ट्रपती पुरस्कार पटकावला आहे. ही उल्लेखनीय कामगिरी शहराच्या स्वच्छतेच्या दिशेने घेतलेल्या पावलांचे फलित असून, संपूर्ण गोव्यासाठी अभिमानास्पद क्षण ठरला आहे, असे महापौर रोहित मोन्सेरात यांनी म्हटले आहे.
पणजी महापौर रोहित मोन्सेरात आणि महापालिका आयुक्त क्लेन मदेरा हे दोघे 17 जुलै रोजी नवी दिल्ली येथे भारताच्या राष्ट्रपतींकडून हा पुरस्कार स्वीकारणार आहेत. देशपातळीवर मिळालेला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार शहरातील नागरिकांच्या सहकार्याने आणि मनपाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच शक्य झाला आहे. महापौर मोन्सेरात यांनी सांगितले की, शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्यासाठी महापालिकेने अनेक उपक्रम राबवले. नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे आज आपण या यशापर्यंत पोहोचू शकलो आहोत. स्वच्छ सर्वेक्षण ही केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयातर्फे दरवर्षी राबवली जाणारी स्पर्धा आहे. देशभरातील शहरे त्यांच्या स्वच्छतेच्या निकषांवर आधारित मूल्यांकनातून निवडली जातात. या स्पर्धेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वच्छतेकडे गांभीर्याने पाहण्याची नवी दिशा मिळाली आहे. हा पुरस्कार म्हणजे केवळ एक गौरव नव्हे, तर भविष्यात आणखी चांगले कार्य करण्यासाठी प्रेरणा असल्याचेही महापौर मोन्सेरात यांनी स्पष्ट केले आहे.
भारत सरकारच्या शहरी व ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे देण्यात येणार्या स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये साखळी पालिकेला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. 17 जुलै रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात या पुरस्काराचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत वितरण होणार आहे. हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल साखळी नगराध्यक्ष सिद्धी प्रभू पोरोब यांनी आनंद व्यक्त केला आहे. साखळीचे आमदार व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पाठिंब्यावर साखळी पालिकेने ‘स्वच्छ साखळी, सुंदर साखळी’ अभियान राबवले. यामुळे साखळी स्वच्छ दिसू लागली आणि त्यामुळे हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, असे मत सिद्धी प्रभू पोरोब यांनी व्यक्त केले.