- तिर्थेषा गुदले
पणजी : यंदाच्या २० ते २८ नोव्हेंबर २०२६ दरम्यान चालणारा ५७ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) पुन्हा एकदा हे सिद्ध करतो की, हा केवळ चित्रपटकर्त्यांसाठीचा उद्योग मेळावा नाही, तर प्रत्येक आबालवृद्धांसाठी तयार केलेली एक परिपूर्ण सांस्कृतिक आणि मनोरंजनाची मेजवानी आहे. गोव्याची ओळख आणि इफ्फीचा सुवर्ण इतिहास गोव्याला चित्रपट महोत्सवाचे कायमचे माहेरघर बनवण्याचा प्रवास २००४ मध्ये सुरू झाला. तो आजतागायत सुरू आहे.
या वर्षीचा इफ्फी 'सीमांविना कथा' या प्रभावी संकल्पनेवर आधारित आहे. इफ्फी सुरू असताना पणजीच्या रस्त्यांवरून चालताना, हा महोत्सव संपूर्ण शहरावर कसा मोहिनी घालायचा हे तुम्हाला जाणवते. चित्रपटगृहात पाऊल ठेवण्यापूर्वीच येथील उत्सवी वातावरण तुम्हाला आपल्यात सामावून घेते. दरवर्षी इफ्फीच्या सुवर्ण आणि रौप्य मयुरांचे (गोल्डन आणि सिल्व्हर पिकॉक) प्रतीक असणारे आकर्षक मयुरांचे कलाप्रकार लक्षवेधी आकार व रंगांमध्ये संपूर्ण शहरात सजवले जातात.
संध्याकाळ होताच, रस्ते झगमगत्या रोषणाईने उजळून निघतात. पर्यटकांना थेट गजबजलेल्या रेड कार्पेटपर्यंत घेऊन जातात. २५ नोव्हेंबरला निघणारी 'इफ्फी परेड' संगीत, रंग आणि सिनेमाई थाट थेट रस्त्यांवर घेऊन येते. ज्यामुळे पणजी एका खुल्या हवेतील कार्निव्हलमध्ये बदलते.
महोत्सवादरम्यान पणजीमध्ये खवय्यांकरता अस्सल गोवन पदार्थापासून ते महाराष्ट्रीयन, गुजराती आणि दाक्षिणात्त्य अशा विविध प्रकारच्या खमंग आणि स्वादिष्ट पदार्थाची मोठी रेलचेल पाहायला मिळते. या वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेत महोत्सव अनुभवणे हा एक वेगळाच आनंद असतो. जादू कायम राहाते. गोव्याचे निसर्गसौंदर्य आणि नोव्हेंबर महिन्यातील आल्हाददायक हवामान यामुळे पणजीचे वातावरण आधीच खूप प्रसन्न असते आणि त्यात जेव्हा 'इफ्फी'ची जादू मिसळते तेव्हा येथे निखळ आनंद, मनोरंजन आणि परमानंदाचे वातावरण प्रत्यक्ष अनुभवायला मिळते.
इफ्फीचे हेच अनोखे वैशिष्ट्य असल्यामुळे देश-परदेशातील सिनेअभ्यासक असोत किंवा चित्रपट क्षेत्राशी निगडित प्रत्येक व्यक्ती, त्यांची पावले गोव्याकडे आपसूकच वळतात. सिनेरसिक, आस्वादक आणि फिल्म मीडियाच्या अभ्यासक या सर्वांच्या मनामध्ये इफ्फीच्या मोराचा पिसारा असाच अविरत फुलत जातो.
नवनवीन रंगछटा गवसतच जातात. सर्वांनाच इफ्फी सप्तरंगात न्हाहून निघालेली भासते. मग तुम्ही रेड कार्पेटवरील ताऱ्यांच्या झगमगाटासाठी तिथे जा, चित्रपट निर्मितीच्या कार्यशाळांमध्ये ज्ञान घेण्यासाठी जा किंवा पणजीच्या सजलेल्या उजळलेल्या रस्त्यांचा व खाद्यपदार्थांचा आनंद घेण्यासाठी जा... इफ्फी फक्त पहिला जात नाही, तर तो संपूर्णपणे जगला जातो.