पणजी : दीपावलीच्या पूर्वसंध्येला पणजी शहरात ध्वनिप्रदूषण करणाऱ्या नरकासुर आयोजकांवर पोलिसांनी कडक कारवाई केली. साऊंड परवाना नसताना मोठ्या आवाजात संगीत वाजविणाऱ्या तब्बल १० नरकासुर पथकांवर कारवाई करण्यात आली आहे. संबंधितांची स्पीकर आणि साऊंड सिस्टीम जप्त करण्यात आली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने ७ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून ८ नोव्हेंबरच्या सकाळी ६ वाजेपर्यंत लाऊडस्पीकर आणि साऊंड अॅम्प्लिफायरवर संगीत वाजविण्यास मनाई केली होती. आदेशाचे उल्लंघन आढळल्यास तातडीने कारवाई करण्याबरोबरच संबंधितांची नावे न्यायालयाच्या रजिस्ट्रीला कळविण्याचे निर्देशही देण्यात आले होते. त्यामुळे यावर्षी पोलिसांनी सर्व भागामध्ये पोलिस गस्त वाढवून रात्री १२ वाजल्यानंतर सर्व साऊंड सिस्टीम सक्तीने बंद करण्यात आले. कारवाईच्या भीतीने काहींनी वेळेचे बंधन पाळले; मात्र ज्या ठिकाणी रात्री १२ वाजल्यानंतरही साऊंड सिस्टीम सुरू होती. तेथे पोलिसांनी हस्तक्षेप करून ती बंद पाडली.
नरकासुर उत्सवाच्या निमित्ताने शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणावर नरकासुर प्रतिमा उभारण्यात आल्या होत्या. अनेक ठिकाणी डीजे, स्पीकर आणि अॅम्प्लिफायरच्या माध्यमातून मोठ्या आवाजात संगीत सुरू होते.
मात्र, ध्वनिप्रदूषणासंदर्भातील नियमांचे पालन करणे बंधनकारक असतानाही काही मंडळांनी आवश्यक परवानगी न घेता साऊंड सिस्टीमचा वापर केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले, त्यामुळे त्यांची साऊंड सिस्टीमच जप्त करण्यात आली. गोवा सरकारने २०२६ मध्ये काही विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक प्रसंगी रात्री १० ते मध्यरात्रीपर्यंत लाऊडस्पीकर वापरण्यास सशर्त परवानगी दिली होती. मात्र, त्यासाठी संबंधित मंडळ किंवा आयोजकांनी स्वतंत्र परवानगी घेणे आणि ध्वनिप्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक होते.
कर्णकर्कश संगीताच्या यंदाही तक्रारी
नरकासुर उत्सवाच्या नावाखाली होणाऱ्या कर्णकर्कश संगीतामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आजारी व्यक्ती तसेच निवासी भागातील नागरिकांना मोठा त्रास होत असल्याच्या तक्रारी यंदाही समोर आल्या. त्यामुळे उत्सवाची परंपरा कायम ठेवताना ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.