पणजी : पणजी महापालिकेची निवडणूक ११ मार्च रोजी होणार आहे, तर ९ मार्च रोजी सायंकाळी ५ वा. जाहीर प्रचार बंद होणार आहे, त्यामुळे पुढील दोन दिवस जास्तीत जास्त घरांपर्यंत पोचण्यासाठी प्रोग्रेसिव्ह फ्रंट ऑफ पणजी आणि आम्ही पणजीकर या दोन्ही पॅनलचे नेते आणि उमेदवार प्रचाराला जोर लावताना दिसत आहेत. घरोघरी प्रचारासोबतच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार केला जात आहे.
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर यांनी ही निवडणूक गंभीरपणे घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ते आपल्या आम्ही पणजीकर या पॅनलच्या उमेदवारांसोबत घरोघरी फिरताना दिसत आहेत. त्यांना विरोधी पक्षात असलेले आमचे अध्यक्ष वाल्मिकी नाईक, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव व काँग्रेसचे नेते आणि इतर विरोधी पक्षांचा पाठिंबा लाभलेला आहे. तर पणजीचे आमदार आणि महसूल मंत्री बाबूस मोन्सेरात यांच्या नेतृत्वाखालील प्रोग्रेसिव्ह पॅनेलच्या उमेदवारांचा प्रचार उमेदवारांनाच करावा लागत आहे.
कारण, बाबूस मोन्सेरात प्रकृती अस्वास्थ्यमुळे सर्वत्र प्रचाराला फिरू शकत नाहीत. भाजपचे नेते व आमदारांनी प्रचारात सहभाग घेण्याचे ठरवले होते. मात्र, अद्याप त्यांचा सहभाग प्रोग्रेसिव्ह पॅनेलच्या उमेदवारांसाठी दिसत नाही. सध्याच्या घडीला तरी आम्ही पणजीकर पॅनेल मोन्सेरात यांच्या पॅनेलला जोरदार टक्कर देणार, अशी चिन्हे दिसत आहेत.