पणजी : पुढारी वृत्तसेवा
यंदा पावसाचे एकूण प्रमाण जरी कमी असले तरीही त्याचा भात पिकावर कोणताही गंभीर परिणाम होणार नाही. त्यामुळे काळजीचे कारण नाही. उत्पादनात काहीशी घट होईल, पण पिकाचे नुकसान झाल्याची घटना अद्याप कुठेही घडलेली नाही, अशी माहिती कृषी संचालक चंद्रहास देसाई यांनी दिली.
यंदा पावसाचे प्रमाण हे मागील काही वर्षांच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. तसेच पर्यावरणप्रेमींना उन्हाळ्यातील चित्र कसे असेल याची चिंता सतावू लागली आहे. अशा वेळी राज्यातील पिकांची स्थिती जाणून घेण्यासाठी कृषी संचालक देसाई यांची भेट घेतली असता त्यांनी ही माहिती दिली.
देसाई यांनी सांगितले की, पाऊस जरी कमी प्रमाणात झाला असला तरीही काळजीचे कारण नाही. भात पीक काही प्रमाणात कमी होईल. मात्र, पावसामुळे पिकावर फारसा परिणाम झालेला नाही. कमी प्रमाणात का होईना दिवसातून किमान दोन वेळा तरी पाऊस पडत आहे. तो भात पिकासाठी पुरेसा आहे. यंदा कुठेही पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची घटना कुठेही घडलेली नाही किंवा तशा प्रकारची कुठेही नोंद नाही. त्यामुळे नुकसान भरपाईची वेळ आलेली नाही.
पावसाची प्रतीक्षा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात चिंता दिसून येते. पावसाचे आगमन उशिरा झाल्यामुळे लावणीची कामेही उशिरा आटोपली. परिणामी पिकाची वाढ होण्यासाठी अजून काही दिवस लागतील. अशा वेळी आवश्यक त्या प्रमाणात पाऊस पडताना दिसत नाही.
राज्यात मागील वर्षी उत्तर गोव्यात हत्तीचे आगमन झाले. त्यावेळी हत्तीकडून स्थानिक शेतकरी, बागायतदार यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले. त्या नुकसानीची संबंधित खात्याकडून पाहणी आणि पंचनामा करण्यात आला. त्याबरोबरच ज्यांचे नुकसान झाले, त्या सर्वांना सरकारच्या वतीने भरपाई देण्यात आलेली आहे, अशी माहिती देसाई यांनी दिली. ते म्हणाले की, यंदा हत्तीमुळे अजून फारसे नुकसान झालेले नाही. एका ठिकाणी नुकसानीची तक्रार प्राप्त झाली आहे.