गोवा

अवयवदानातून सहा वर्षांत 18 जणांना जीवनदान

नऊ अवयवदात्यांच्या कुटुंबीयांच्या निर्णयामुळे अनेकांना नवे आयुष्य : प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षा यादी वाढती

पुढारी वृत्तसेवा

पणजी : २०१९ ते २०२५ या कालावधीत राज्यात अवयवदानाच्या माध्यमातून १८ रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. गेल्या सहा वर्षात नऊ व्यक्तींच्या कुटुंबीयांनी अवयवदानास संमती दिल्याने ही प्रत्यारोपण प्रक्रिया यशस्वी झाली. यांपैकी बहुतांश रुग्णांवर मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले. अवयवदान जीवनदान नैतिक अवयव आणि ऊतक प्रत्यारोपणाला चालना देण्यासाठी डिसेंबर २०१९ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या स्टेट ऑर्गन अँड टिशू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन (सोटो) गोवाच्या माध्यमातून या अवयवदानाचे समन्वयन करण्यात आले. राज्यात मूत्रपिंड प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध असली तरी हृदय, फुफ्फुसे आणि इतर अवयवांच्या प्रत्यारोपणासाठी आवश्यक सुविधा नसल्याने काही अवयव राज्याबाहेरील रुग्णालयांकडे पाठविण्यात आले.

डॉक्टरांकडून एखाद्या व्यक्तीला ब्रेन-स्टेम डेड घोषित केल्यानंतर आणि त्या व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कुटुंबीयांच्या संमतीने अवयवदानाची प्रक्रिया पार पाडली जाते. २०१९ पासून अशा नऊ कुटुंबांनी अवयवदानाला संमती दिल्यामुळे १८ रुग्णांचे प्राण वाचले आहेत. ब्रेन-स्टेम डेड व्यक्तीचे हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुसे, स्वादुपिंड यांसारखे महत्त्वाचे अवयव तसेच कॉर्निया, त्वचा आणि हाडांसारख्या ऊती दान करून अनेक रुग्णांना नवे जीवन देता येते किंवा त्यांच्या आरोग्यात लक्षणीय सुधारणा करता येते.

गोवा मेडिकल कॉलेज येथील सोटो गोवाच्या सहसंचालिका डॉ. प्रीती वर्गीस यांनी सांगितले की, २०१९ पासून सोटोने आठ अवयवदानांचे यशस्वी समन्वयन केले असून त्यातून २९ अवयवांचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. २०२५ मध्ये एका दिवंगत अवयवदात्याच्या अवयवांमुळे पाच जणांचे प्राण वाचले. त्या अवयवदात्याच्या पत्नीचा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी नुकताच गौरव केला.

प्रत्यारोपण चिकित्सक प्रमुख सल्लागार डॉ. अमोल महालदार यांनी सांगितले की, संमाव्य अवयवदात्यांच्या कुटुंबीयांकडून संमती मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जर अशा प्रकरणांपैकी ५० टक्के कुटुंबीयांनी जरी संमती दिली, तरी २० व्यक्तींकडून ४० मूत्रपिंडे उपलब्ध होऊ शकतील. त्यामुळे प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षा यादीतील अनेक रुग्णांना मोठा दिलासा मिळू शकतो.

दरवर्षी सुमारे ८० जण ब्रेन-स्टेम डेड

राज्यात दरवर्षी सुमारे २५० प्राणघातक डोक्याच्या दुखापतींची नौद होते. त्यापैकी जवळपास एकतृतीयांश म्हणजे सुमारे ८० व्यक्ती ब्रेन-स्टेम डेड होण्याची शक्यता असते. मात्र सर्वच कुटुंबीय अवयवदानास संमती देत नसल्याने अनेक रुग्णांना जीवनदानाची संधी गमवावी लागते, असे डॉ. प्रीती वर्गीस यांनी सांगितले.

१३ अवयव राज्याबाहेर पाठविले

गोव्यात हृदय, फुफ्फुसे आदी अवयवांच्या प्रत्यारोपणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने १३ विविध अवयव प्रादेशिक अवयव व ऊतक प्रत्यारोपण संस्था तसेच राष्ट्रीय अवयव व ऊतक प्रत्यारोपण संस्थेच्या समन्वयाने राज्याबाहेरील रुग्णालयांमध्ये पाठविण्यात आले. तेथे या अवयवांचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले

६० हून अधिक रुग्ण प्रतीक्षा यादीत

सध्या राज्यात ६० हून अधिक रुग्ण मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षा यादीत आहेत. प्रतीक्षा यादी सातत्याने वाढत असल्याने नव्याने नोंदणी झालेल्या रुग्णाला प्रत्यारोपणासाठी दहा वर्षांहून अधिक काळ प्रतीक्षा करावी लागू शकते. इतका कालावधी अनेक रुग्णांसाठी जीवघेणा ठरू शकतो, अशी माहिती डॉ. अमोल महालदार यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT