पणजी : पुढारी वृत्तसेवा
ओंकार हत्तीला पकडण्याऐवजी त्याला पुन्हा सिंधुदुर्गात पाठवणे हाच पर्याय आहे, असे मत राज्याचे वनसंरक्षक (वन्यजीव आणि पर्यावरण पर्यटन) नवीन कुमार यांनी व्यक्त केले. ओंकारच्या वारंवारच्या घुसखोरीमुळे गोवा वन विभाग पुन्हा सतर्क झाला आहे. अधिकारी त्याला पकडण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, महाराष्ट्रातील त्याच्या कळपाकडे परत नेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पेडणे तालुक्यातील सीमेवरील गावांमध्ये ओंकार सुमारे १२ वेळा दिसला आहे, असे वन विभागाचे म्हणणे आहे.
पाच हत्तींचा कळप दोडामार्ग परिसरात आहे. ओंकारचे कळपापासून वारंवार दूर जाणे हे त्याच्या अर्ध-प्रौढ नर हत्तीच्या वागणुकीशी संबंधित असू शकते. या टप्प्यावर नर हत्तींना कळपातून हाकलले जाऊ शकते. कळपातील प्रबळ नरांकडून स्पर्धा कमी करण्यासाठी त्याला दूर पाठवले जाते.
ओंकार अंदाज ३०-३१ वर्षांचा असावा आणि तो अजून लैंगिकदृष्ट्या परिपक्व झालेला नाही. परंतु त्याच्यामध्ये स्वतंत्रपणे फिरण्याची प्रवृत्ती विकसित झाली आहे, असेही कुमार यांनी सांगितले.
नवीन कुमार म्हणाले की, अन्न किंवा पाण्याच्या कमतरतेमुळे ओंकार गोव्यात प्रवेश करत असल्याचे कोणतेही संकेत नाहीत.
सीमेच्या दोन्ही बाजूंना पाणी उपलब्ध आहे. मान्सूनच्या परिस्थितीमुळे पुरेशी हिरवळ व अन्नाची उपलब्धता सुनिश्चित झाली आहे, असे सांगून कुमार यांनी ओंकारचा उल्लेख 'मुक्तपणे फिरणारा' असा केला. ओंकारला जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाइस बसवलेले नसल्यामुळे, तो प्रत्यक्ष दिसणे, त्याच्या पावलांचे ठसे आणि इतर क्षेत्रीय पुराव्यांच्या आधारे वन विभागाचे पथक हत्तीचा मागोवा घेत आहे.
तथापि, सुरक्षेच्या कारणास्तव पथके रात्रीच्या वेळी वनक्षेत्रात प्रवेश करणे टाळतात आणि सकाळी हत्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवतात. ओंकारला त्याच्या कळपाकडे परत पाठवणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे; कारण पकडण्याच्या मोहिमेमुळे त्या प्राण्याला अधिक मानसिक धक्का बसू शकतो. जर हत्ती जास्त काळ गोव्यात राहिला, तर गोवा वन विभाग महाराष्ट्राकडून मदत मागू शकतो, असेही कुमार यांनी स्पष्ट केले.
गोव्याने ओंकारला हाताळण्यासाठी कर्नाटकची मदत मागितल्यानंतर वर्षभराने हा नवा प्रस्ताव आला आहे. दरम्यान, कृषी विभागाकडून पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला जात आहे. वन विभागाचे कर्मचारी प्रत्यक्ष गावकऱ्यांना मदत करीत आहेत.
वन विभाग, रहिवाशांना ओंकारच्या उपस्थितीबद्दल सतर्क करण्यासाठी आणि रात्रीच्या वेळी खबरदारी बाळगण्याचा सल्ला देण्यासाठी, व्हॉट्सॲप ग्रुप्ससह गावपातळीवरील संवाद माध्यमांचाही वापर करीत आहे.