पणजी : आई, गणेश, छोटी मादी आणि दोन पिल्लांच्या कळपात शुक्रवार, दि.१९ डिसेंबर २०२५ रोजी गेलेला ओंकार आता कळपाचे नेतृत्व करु लागला आहे. तर ओंकारवर विश्वास ठेवून गणेश अधून मधून आजुबाजूच्या परिसरात एकला चलो रे ची भूमिका बजावत आहे.
हत्तींच्या कळपावर वन विभागाच्या ड्रोनची सतत नजर असते. हत्तींचे लोकेशन ते मिळवत असतात. १९ डिसेंबर रोजी अनेक दिवसांनी ओंकार तेरवण मेढे येथील धरणाजवळ आपल्या आईला भेटला. त्यानंतर तो शनिवारी पहाटे २.५० वा. च्या दरम्यान मुळसच्या दिशेने गेला होता. तेव्हा गणेशसह पाच हत्ती एका कळपात, तर ओंकार एकटाच वावरत होता. त्यानंतर तब्बल १५ दिवसांनी म्हणजे शनिवार, दि. ३ जानेवारी रोजी रात्री ११.२५ वा. ओंकार पुन्हा पाच जणांच्या कळपात आला.
तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे २० दिवस कळपात आहे. या काळात तो नेतृत्वाची धुरा आपल्याकडे घ्यायला शिकला आहे. कळपात राहन त्याने गणेश हत्ती आणि आईकडून नेतृत्व कौशल्य शिकले असावे. त्यामुळे गणेशही आता त्याच्या जीवावर कळप सोडून एकटा फिरत आहे. गुरुवार, दि. २२ रोजी दुपारी १.१५ वा. गणेश हत्तीचा वावर केर येथील गोपाल देसाई यांच्या काजू बागेत होते, तर याचवेळी दुपारी १.१५ वा. ओंकार आईसह छोटी मादी व दोन पिल्ले मोर्ले येथील तळी वरच्या बाजूला वनक्षेत्रात होता.
ओंकारचे नवे रुप ड्रोनमुळे समोर
वन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आता ओंकार या चार जणांच्या कळपाचे नेतृत्व करायला शिकला आहे. ड्रोन कॅमेऱ्यामुळे आता हत्तींच्या हालचाली सहज कळणे शक्य झाले आहे. ओंकारचे मुखियाचे नवे रुपही ड्रोनमुळेच लोकांसमोर आले आहे.