पेडणे : पुढारी वृत्तसेवा
गेल्या काही दिवसांपासून गोवा-महाराष्ट्र सीमेलगतच्या नेतर्डे परिसरात फिरणाऱ्या 'ओंकार' हत्तीने अखेर गोव्याच्या हद्दीत प्रवेश करून कळशी-मोप परिसरात आगमन केल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
हत्तीच्या आगमनाची माहिती मिळताच वनखात्याच्या कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. गेल्या वर्षी याच हत्तीने पेडणे तालुक्यातील विविध भागांतील शेती-बागायतींचे मोठे नुकसान केले होते. त्यामुळे यंदाही त्याची पुनरावृत्ती होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.
'ओंकार'ने गेल्या वर्षापासून कळशी, मोप, तोरसे, उगवे, तांबोसे तसेच लगतच्या परिसरात वावर करत शेती-बागायतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले होते. त्यानंतर गोवा आणि महाराष्ट्र वनखात्याने संयुक्त मोहीम राबवून त्याला सिंधुदुर्गच्या दिशेने रवाना केले होते. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता.
मात्र, मागील आठवडाभरापासून 'ओंकार' पुन्हा नेतर्डे परिसरात फिरत असल्याचे निदर्शनास आले होते. तो गोव्याच्या हद्दीत येण्याची शक्यता लक्षात घेऊन वनखात्याचे कर्मचारी त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. अखेर त्याने कळशी-मोपा परिसरात प्रवेश केल्याने वनखात्याची चिंता वाढली आहे.
सध्या तोरसे, तांबोसे, मोप आणि आसपासच्या भागातील शेती-बागायती ऐन बहरात आहेत. शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून घेतलेली विविध पिके आता उत्पादनाच्या टप्प्यावर आली आहेत. अशा परिस्थितीत हत्तीने शेतात किंवा बागायतीत प्रवेश केल्यास काही तासांत मोठे नुकसान होण्याची भीती आहे.
विशेषतः गणेश चतुर्थी तोंडावर असल्याने नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. गेल्या वर्षाच्या नुकसानीच्या आठवणी ताज्या असतानाच 'ओंकार' पुन्हा दाखल झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. नुकसान झाल्यानंतर भरपाई देण्यापेक्षा नुकसान होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
'ओंकार'चा वावर सीमावर्ती भागात असल्याने गोवा आणि महाराष्ट्र वनखात्याने पुन्हा संयुक्तपणे नियोजनबद्ध मोहीम राबवावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. हत्ती पुन्हा शेती-बागायतींच्या क्षेत्रात येणार नाही, यासाठी कायमस्वरूपी प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कळशी-मोप, तोरसे, तांबोसे आणि लगतच्या परिसरातील शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, 'ओंकार'ला रोखण्यासाठी वनखाते कोणती पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.