पणजी : प्रभाकर धुरी
कळपापासून दूर गेलेल्या ओंकार हत्तीची शुक्रवार, दि. १९ डिसेंबर २०२५ रोजी रात्री तेरवण मेढे येथील उन्नेयी बंधाऱ्या (धरण) जवळ त्याच्या आईशी भेट झाली. तिच्यासोबत टस्कर गणेश, छोटी मादी आणि दोन पिल्लेही होती.
ऑकारला त्या कळपातील हत्ती जवळ करणार नाहीत, गणेश आणि ओंकार यांच्यात संघर्ष होईल, असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला होता. मात्र, हा अंदाज कळपाने फोल ठरवला. त्यांच्या भेटीचा अनुपम सोहळा ओंकारसोबत असलेल्या उपस्थितांनी अनुभवला आणि मनातही साठवला.
त्यांच्या भेटीचे फोटो आणि व्हिडीओही वन विभागाच्या ड्रोनद्वारे टिपले गेले असावेत. त्यांच्या भेटीचा तो क्षण भावनिक होता. गेले अनेक दिवस घाटीवडे बांबर्डेत ठाण मांडून असलेला कळप ऑकार मेढेत पोचल्यावर त्याच्या दिशेने निघाला. ओंकार आणि त्या कळपावर ड्रोनची नजर होती.
कळपाची आणि ओंकारची भेट होणार हे नक्की होते. रात्री १० च्या दरम्यान त्यांची भेट झाली. ती भेट विलक्षण होती. कळपातील गणेश ओंकार जवळ आला, त्याने ओंकारच्या शेपटीला पकडले आणि त्याला जवळ घेत हळुवारपणे कुरवाळले. त्याचवेळी त्याच्या आईनेही त्याला जवळ घेऊन कुरवाळले. त्यांच्यात वेगवेगळ्या आवाजाने संवादही झाला.
हत्तींचीही माणसांसारखी संवादाची भाषा असते. ती अनेकांनी अनुभवली. त्यानंतर तो कळप तेरवण मेढे धरणात गेला. सर्वजण धरणात मस्तपैकी डुंबत होते. साधारण १०.३७च्या दरम्यान त्यांचा पाण्यातील वावर पुन्हा ड्रोनने टिपला. रात्री २- २.३० पर्यंत सगळे एकत्र होते. त्यानंतर ओंकार २.५७ ला मुळसच्या दिशेने जात होता, तो पुन्हा परतून मेढे धरणाजवळ आला, तर त्याचवेळी ५ हत्तींचा कळप मेढे प्राथमिक शाळेच्या बाजूला होता. सकाळी तो पाळयेच्या दिशेने गेला. तर ओंकार झोप घेत होता.
ओंकार, आई, दोन पिल्ले एकत्र राहतील
ओंकार आईसोबत राहायला तो काय दूध पीत नाही. आईसोबत अजून दोन पिल्ले आहेत. त्यांची काळजी आई घेत आहे. ओंकार आणि कळप वेगवेगळ्या संजय सावंत ठिकाणी असले, तरी एकाच भागात आहेत. यापुढे या कळपाचे तीन भाग होतील व ते असेच एकाच परिसरात राहतील. सध्या ओंकार क्वारंटाईन असल्यासारखा राहील आणि ४ ते ८ दिवसांनी ओंकार, आई आणि दोन्ही पिल्ले एकत्र येतील. या भेटीमुळे ओंकार आणि गणेश यांच्यातील संघर्षाची शक्यता संपली आहे, असे प्राणिप्रेमी आणि पर्यावरण अभ्यासक संजय सावंत यांनी सांगितले.
दै. 'पुढारी'चे आभार
ओंकार गोवा सीमेवर पोहोचल्यापासून तो गोव्यातून सावंतवाडी तालुक्यात जाईपर्यंत व पुन्हा गोव्यात येऊन तिळारी खोऱ्यात पोहोचेपर्यंत दै. 'पुढारी'ने बातमीद्वारे पाठपुरावा केला. ओंकारसाठी झालेली आंदोलने, न्यायालयीन लढाई यांचे वस्तुनिष्ठ वार्तांकन केले. ओंकार आणि आईची भेट याकडे सर्वांचे लक्ष होते. त्या भेटीचे वृत्त सर्वप्रथम दिल्याबद्दलही दोन्ही राज्यातील ओंकारप्रेमी, पर्यावरणप्रेमींनी दै. 'पुढारी'चे आभार मानले. ऑकार नैसर्गिक अधिवासात राहावा, ही आमची इच्छा होती, ती पूर्ण झाली, असेही त्यांनी सांगितले