गोव्यातून परतलेला ओंकार १५ दिवसांनंतर पुन्हा कळपात सामील झाला आहे.
तिळारी खोरे गेली २३ वर्षे हत्तींचा नैसर्गिक अधिवास म्हणून ओळखले जाते.
काही फार्म हाऊसवर करंट कुंपण लावून हत्तींना शॉक देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
गणेश–ओंकार संघर्षाचा ड्रोन व्हिडीओ समोर आला असून त्याची सत्यता चर्चेत आहे.
पणजी : प्रभाकर धूरी
गोव्यातून तिळारीत गेल्यावर ओंकार हत्ती तेरवण मेढे येथे आपल्या आईसह गणेश, छोटी मादी व दोन पिल्लांची भेट घेऊन कळपापासून वेगळा झाला होता. हेवाळे परिसरातील गावांमध्ये त्याचा मुक्काम होता. त्यानंतर तब्बल १५ दिवसांनी तो पुन्हा कळपात परतला आहे. सध्या सहाही हत्तींचा कळप एकत्र आहे, तर बाहुबली पुन्हा चंदगड तालुक्यात परतला आहे.
गोव्यातून परतलेल्या ओंकारची आणि त्याच्या आईसह गणेश व अन्य तिघांची भेट शुक्रवार, दि. १९ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता तेरवण मेढे धरणाजवळ (उन्नेयी बंधारा) झाली होती. त्यानंतर १०.३७ वा. सहाही हत्ती धरणात डुंबत होते. साधारणपणे शनिवारी पहाटे २.३० पर्यंत ते एकत्र होते. त्यानंतर ओंकार हत्ती २.५७ वा. मुळसच्या दिशेने गेला.
हेवाळे येथील जंगल भागात त्याचा मुक्काम होता. त्याचा जन्म याच परिसरात झाल्याने हा सगळा भाग त्याला परिचित होता. तो या परिसरात वावरत असताना ५ हत्तींचा कळप पाळ्ये, मोर्ले, घोटगेवाडी भागात वावरत होता. या कळपाने घोटगेवाडीत शेती बागायतीचे मोठे नुकसान केले आहे. तिळारी खोऱ्यातील अनेक गावे हत्तींचा नैसर्गिक अधिवास (वनस्पती, प्राणी किंवा इतर जीवांचे नैसर्गिक घर, जिथे त्यांना जगण्यासाठी आवश्यक अन्न, पाणी मिळते. उदा. जंगल, समुद्र) आहेत. इथे त्यांना भरपूर खायला, प्यायला मिळते.
शिवाय इथले जंगल हत्तींच्या प्रजोत्पादनास अनुकूलही आहे. त्यामुळे हत्तींचा मुक्काम (अधिवास) गेली २३ वर्षे या भागात आहे. ओंकारचा जन्म याच परिसरात झाला आहे. शिवाय अन्य दोन पिल्लेही याच भागात जन्मल्याचा दावा हत्ती अभ्यासकांचा आहे. ऑकार गोव्यातून परतण्यापूर्वी घाटीवडे, बांबर्डे, हेवाळे या भागात ५ हत्तींच्या कळपाचा वावर होता. आता पुन्हा सहाही हत्ती त्याच भागात गेले आहेत.
सहाही हत्ती पाळ्ये, हेवाळे, बांबर्डेच्या दिशेने... काल, शनिवार दि. ३ जानेवारी २०२५ रोजी रात्री ११.२५ वा. तब्बल नऊ दिवसांनी पुन्हा एकदा ओंकार आणि ५ हत्तींच्या कळपाची भेट झाली. पाळ्ये येथील गेल पाईपलाइनजवळ ओंकारसह सहाही हत्तींचा वावर होता. त्यानंतर शनिवार, दि. ४ रोजी मध्यरात्री १.३५ वा. कळपाचा वावर पाळ्ये वागिरे येथे होता. तेथून हा कळप हेवाळे येथील मालकी जंगलात आज, दुपारी १२ वाजता आढळला. तो ४.२५ वा. च्या सुमारासही तो त्याच ठिकाणी होता. त्यानंतर मात्र हा सहाही हत्तींचा कळप सायंकाळी ७.३० वा. बांबर्डे कुळवाच्या दिशेने निघाला आहे.
ओंकारला शॉक देण्याची तयारी
ओंकारचा वावर असलेल्या भागात परप्रांतीय लोकांनी फार्म हाऊस उभारली आहेत. त्यात काहींनी बागायतीही केली आहे. त्यात ओंकार किंवा अन्य हत्ती घुसू नये म्हणून त्यांनी आपल्या मालमत्तेभोवती तारांचे कुंपण उभारले आहे. रात्रीच्या वेळी त्या तारांमध्ये वीजप्रवाह (करंट) सोडून ओंकार व अन्य हत्तींना शॉक देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. काही स्थानिकांच्या ही बाब लक्षात आल्याने तिळारी खोऱ्यातील सर्वच फार्म हाऊसची वन विभाग, पोलिस आणि वीज वितरण विभागाने पाहणी करावी, अशी मागणी होत आहे
गणेश-ओंकारची लढाई : खरी की लुटुपुटूची ?
ओंकार मिसळल्याने कळपाला पूर्णत्व आले आहे. मात्र, रात्री ओकार आणि गणेश यांच्यात संघर्ष झाल्याचे व त्या थराराचा व्हिडीओ वन विभागाच्या ड्रोनमध्ये चित्रित झाल्याचे सांगण्यात येते. दोघांमध्ये लढाई होऊनही गणेश आणि ओंकार कालपासून आज रात्रीपर्यंत एकत्रच एकाच कळपात आहेत. त्यामुळे ती लढाई खरी होती की, लुटुपुटूची होती असा प्रश्न उभा राहतो आहे.