काव्या कोळस्कर
पणजी : अनेकदा आपल्यामध्ये सुप्त गुण असूनही त्यांना वाव किंवा त्या गुणांना चालना देण्यासाठी योग्य संधी मिळत नाही. मात्र माझ्यातील इतरांना प्रेमाने खाऊ घालण्याच्या आवडीला माझ्या मुलींच्या जिद्दीपोटीच बळ. मी स्वयंसहायता गटाची सुरुवात करून माझ्या नव्या प्रवासाला आणि आयुष्याच्या नव्या टप्प्याला सुरुवात केली, असे कथन वार्देशमध्ये राहणाऱ्या कालिंदी म्हार्दोळकर यांनी केले.
पणजी लोकोत्सव २०२६ मध्ये कालिंदी यांनी घरगुती खाद्यपदार्थांचा स्टॉल उभारला आहे. त्यामध्ये लाडू, चिवडा, कुकीज, शंकरपाळ्या, चकली, गोड इडली यासह नानाविध प्रकारची उत्पादने माफक दरात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
आपल्या प्रवासाबद्दल त्या सांगतात की, मी वयाच्या १५व्या वर्षापूर्वीपासूनच आईच्या हाताखाली घरातली सर्व कामे आणि स्वयंपाक करायला शिकले. पुढे लग्न झाल्यानंतर मला दोन मुली झाल्या. त्यांचे शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी त्या मोठ्या होईपर्यंत मी संपूर्णपणे माझा वेळ त्यांनाच दिला. या सर्व प्रवासामध्ये मी माझ्या हातचे पदार्थ माझे नातेवाईक आणि मित्रपरिवार यांना खाऊ घालत असे. याचसोबत माझ्या ऐपतीप्रमाणे गरजूंना दान आणि अनेक पदार्थ मंदिरांमध्येही देते.
एकदा माझी मुलगी अचानक मला म्हणाली, 'आई मी तुला चॅलेंज देते की तुझ्या या स्वयंपाक कलेचा वापर करून तू पैसे कमव.' मी तिचे हे आव्हान स्वीकारलेही. तो क्षण माझ्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला. मी स्वयंसहायता गटाची सुरुवात केली आणि माझ्या याच कलेला एक व्यासपीठ मिळाले. पैसे कमावणे हेच माझे मुख्य ध्येय नसून माझ्या आईच्या शिकवणीतून माझ्याकडे आलेला स्वयंपाकाचा गुण आणि इतरांना खाऊ घालण्याचे समाधान मला मिळावे, यातून मी हा व्यवसाय सुरू केला.
मी देखील लखपती दीदी होणार !
गोवा सरकार आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महिला सक्षमीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. यात स्वयंसहायता गटांना सरकारचा सर्वतोपरी पाठिंबा आहे. महिलांनी उद्योग-व्यवसायात उंच भरारी घ्यावी, या मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नापोटी अनेक महिलांनी हा मार्ग निवडला आहे. मीही त्यांना लखपती दीदी होऊन दाखवेन, असे कालिंदी यांनी भावुक होत सांगितले.
स्टॉलच्या नफ्यातून मुलींसोबत केरळ दर्शन !
कालिंदी सांगतात, माझा व्यवसाय एक वर्षांपासूनच सुरू झाला. मात्र एका प्रदर्शनात मी माझ्या खाद्यपदार्थाचा स्टॉल लावल्यानंतर मला १० हजारांचा नफा झाला. या नफ्यातून मी माझ्या लेकींसोबत केरळची ट्रिप केली. त्यावेळी गोव्यापासून केरळपर्यंत चारचाकी मी स्वतः चालवली. मला वाटते समाजातील इतर महिलांनीही स्वतःच्या आवडी निवडींना प्राधान्य देऊन आयुष्याचा खरा आनंद लुटला पाहिजे.