cutting tree file photo
गोवा

Off the record - गोवा विकायला काढलेले नेते उद्या जाऊन थंड हवेच्या देशात राहतील; पण...

ऑफ दि रेकॉर्ड- गोवा विकायला काढलेले नेते उद्या जाऊन थंड हवेच्या देशात राहतील; पण...

पुढारी वृत्तसेवा

युरींची विनोदबुद्धी

राजकारणात गेल्यावर विनोदबुद्धी शाबूत राहीलच याची काही शाश्वती नसते; मात्र ज्यांनी ती टिकवून ठेवली त्यांना मानले पाहिजे. काही दिवसांपूर्वी नगर नियोजन मंत्री विश्वजित राणे यांच्या दोनापावला येथील बंगल्यावर काही लोकांनी मोर्चा नेला होता. या मोर्चा प्रकरणात युरी आलेमाव यांच्यासह अनेक नेते आणि कार्यकर्त्यांवर एफआयआर दाखल करण्यात आले होते. सोमवारी युरी आलेमाव व क्रूझ सिल्वा यांची पोलिसांनी या प्रकरणात चौकशी केली. युरी आलेमाव पत्रकारांशी बोलताना म्हणाले की आईने मला समन्स आल्याचे सांगितले तेव्हा मला खूप आनंद वाटला. कारण विधानसभा अधिवेशन बोलावण्याची मागणी आम्ही केली होती. नंतर कळले हे पोलिसांचे समन्स. त्यांच्या या तिरकस वक्तव्यावर एकच खसखस पिकली.

असे हे सौहार्द

एका बाजूला सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल काढलेले आक्षेपार्ह उद्‌गार गाजत असताना शिरगाव येथील श्री लईराई देवीच्या जत्रोत्सवाला काँग्रेसचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव व एल्टन डिकॉस्ता यांनी भेट देऊन पुन्हा एकदा हिंदू ख्रिस्ती एकतेचे उदाहरण दाखवून दिले. गोव्यात खरे तर हे काही नवीन नाही. दरवर्षी ओल्ड गोवा येथील फेस्ताला मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री, आमदार उपस्थिती लावत असतात. ख्रिसमसच्या वेळी आर्चबिशप यांचे शेरमांव ऐकायला अनेक जण जात असतात. तसेच हिंदू देवतांच्या मंदिरात, जत्रोत्सवात ख्रिस्ती नेते व लोकही भाविकतेने जात असतात. हे सौहार्द टिकले पाहिजे. त्यासाठी सर्वपक्षीय, सर्व जाती धर्माच्या नेत्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

ते पळतील थंड हवेच्या देशात

राज्यात सध्या अभूतपूर्व असा उकाडा सुरू आहे. उन्हाच्या असह्य झळा अंगाची काहिली करत आहेत. एखाद दिवस पावसाचा शिडकावा झाला तर तेवढेच बरे वाटेल असे लोक म्हणत आहेत. जंगले उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. गावोगावी मेगा प्रोजेक्ट येत आहेत. वीज, पाणी, मलनिस्सारण अशा पायाभूत सुविधांवर त्यामुळे ताण येतोच. मात्र या बेसुमार वृक्षतोडीमुळे तापमान सातत्याने वाढते आहे. गोव्यात सध्या द्रुतगतीने होत असलेला 'विकास' आणि वाढता उकाडा याचा अन्योन्य संबंध आहे. गोवा विकायला काढलेले नेते उद्या जाऊन थंड हवेच्या देशात राहतील; पण आपल्याला इथेच राहायचे आहे असे लोक आता म्हणू लागले आहेत.

भगवान परशुरामांची अॅलर्जी?

सरकारने यंदा भगवान परशुराम अवतरण महोत्सव राज्यात मोठ्या गाजावाज्यासह साजरा केला. समाजाला एकत्र आणायचे तर काही ना काही निमित्त लागते. दोन वर्षांपूर्वी श्रीराम मंदिराचा विषय होता. यंदा परशुराम पावले. अर्थात परशुराम महोत्सव करताना इतर धर्मीयांच्या विरोधात काही बोललेच पाहिजे असे नाही. पण तेवढा विवेक प्रत्येकाला असतोच असे नाही. त्यावर प्रतिक्रिया देणारेही तेवढेच दोषी आहेत. यापूर्वी अनेक भगवान गोव्यात आले. त्याचे कोणाला काही वाटले नाही. मग भगवान परशुरामांचीच अॅलर्जी का?

आता पणती मोर्चा काढणार?

अखेर गौतम खट्टर याला अटक झाली आहे. सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल आक्षेपार्ह उद्‌गार काढल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्या आरोपाचे उट्टे म्हणून काही ख्रिस्ती समाजातील लोकांनी हिंदू देव देवतांची टिंगळटवाळी करणारे पोस्ट समाज माध्यमांवर केले. खट्टर यांचे चुकलेच आहे. तसे बोलून दाखवायला अनेक नेते पुढे आले. त्याला पकडावे म्हणून निवेदने, मेणबत्ती मोर्चे काढून झाले. आता हिंद देवदेवतांची टिंगलटवाळी करणाऱ्या व्यक्तींवरही कारवाई करा असे सांगणारा मेणबत्ती किंवा पणती मोर्चा निघतो का, याची नागरिक वाट पाहत आहेत.

दोन पेपर दिलेच नाहीत, कारण...

नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला असून एक गमतीशीर घटना समोर आली आहे. परीक्षा सुरू असताना सहाव्या पेपरला एक विद्यार्थी गैरहजर राहिल्याचे समोर आले. यानंतर त्यामागील कारण तपासले असता तो चक्क कुटुंबीयांसोबत आपल्या मूळ गावी झारखंडला गेल्याचे समोर आले. त्याच्या पालकांशी संपर्क साधला असता "आमचे आधीच ट्रेन बुकिंग झाले होते..." असे सहज उत्तर त्यांनी दिल्याने यावर नेमकी काय प्रतिक्रिया द्यायची असा प्रश्न बोर्डापुढे उभा राहिला. या सगळ्यामुळे त्या विद्यार्थ्यान दोन पेपर दिलेच नाहीत. आता तो पुरवणी परीक्षा तरी देणार की नाही कुणास ठाऊक...

सरकारी नोकरीचे गारुड

सरकारी नोकरी म्हणजे आरामदायी, सुरक्षित नोकरी, अशी गोव्यातील तरुण-तरुणींची मनोधारणा झाली आहे आणि ते सत्यही आहे. त्यामुळेच सरकारने ज्या-ज्या वेळी नोकरीसाठी जाहिराती दिल्या त्या-त्या वेळी खासगी कंपनीत उच्च पदावर असलेल्या व्यक्ती ही सरकारच्या साध्या साध्या नोकरीसाठी अर्ज करताना आणि परीक्षा देताना दिसत आहेत. रविवार दि. २६ रोजी विविध पदांसाठी सरकारने कंप्युटर परीक्षा घेतली. त्यावेळी एका खासगी कंपनीत तब्बल दीड लाख रुपये वेतन असलेल्या व सेवेत कायम असलेल्या दोन व्यक्ती अव्वल कारकून पदाची परीक्षा देण्यासाठी आल्या होत्या. आता बोला. यावरून सरकारी नोकरीच हवी, ही मानसिकता किती प्रखर बनली आहे हे कळते.

भित्रे नेते आणि जनता

परवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला करण्याचा कट उधळण्यात आला. ज्या ठिकाणी कॉन्फरन्स सुरू होती तिथे हल्लेखोर घुसला व त्याने गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकताच सुरक्षा अधिकाऱ्यांनी ट्रम्प व इतर नेत्यांना सुरक्षित स्थळी हलवले. गोळीबाराचा आवाज ऐकताच नेत्यांची एकच गाळण उडाली. नुसत्या गोळीबाराच्या आवाजाने त्यांची ही अवस्था झाली. त्यांच्या सुरक्षेसाठी कडेकोट व्यवस्थाही आहे. मात्र हेच नेते जेव्हा दुसऱ्यांच्या जीवाची पर्वा न करता युद्ध लादतात, लहान मुले, निरपराध नागरिक मारले जातात तेव्हा त्यांना त्याचे काहीच वाटत नाही. जोपर्यंत आपल्यावर प्रसंग येत नाही तोपर्यंत त्याचे गांभीर्य जाणवत नाही. अर्थात अशा गोष्टींतून बोध घेतला तर ते नेते कसले ?

बाबूंची गुप्तता

माजी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते बाबू आजगावकर हे पेडणे विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत असलेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर आपली रणनीती अत्यंत गुप्त ठेवत असल्याचे दिसून येत आहे. आपण २०२७ची विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असले, तरी आपल्या रणनीतीबाबत त्यांनी मौन बाळगले आहे. त्यांना भाजपकडून उमेदवारी नाकारली गेली, तर ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवतील का? तुम्ही त्यांना हा प्रश्न विचारलात, तर ते तुम्हाला कदाचित याची आठवण करून देतील की, ते अजूनही सत्ताधारी पक्षाचेच सदस्य आहेत. आपली पुढील चाल खेळण्यासाठी ते योग्य क्षणाची वाट पाहात आहेत का? हे केवळ काळच सांगू शकेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT