प्रभाकर धुरी
पणजी : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २०२५ मध्ये २ लाख १४ हजार ६०२ प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. तर वाहतूक उल्लंघनप्रकरणी पोलिसांनी ११ कोटी ७५ लाख १७ हजार १०० रुपये एवढा दंड ठोठावला आहे.
मात्र, २०२४ मध्ये ४,१०,१२५ वाहतूक नियमभंगाची प्रकरणे होती, तर दंडाची रक्कम २४ कोटी ८७ लाख ४२, ४०० एवढी होती. वाहतूक शाखेचे पोलिस अधीक्षक प्रबोध शिरवईकर व साहाय्यक पोलिस अधीक्षक सुदेश नार्वेकर यांनी ही माहिती दिली. वाहतूक खात्याने केलेल्या विविध जनजागृती कार्यक्रमांमुळे २०२५ मध्ये वाहतूक नियमभंगाची प्रकरणे निम्म्यावर आली आहेत.
पोलिस खात्याने केलेल्या प्रयत्नांची ही सकारात्मक परिणीती म्हणावी लागेल. राज्यात रस्ते अपघातांचे प्रमाण खूप आहे. २०२४ मध्ये २,६८२ अपघात झाले, तर २०२५ मध्ये २,३७० अपघात घडले होते. त्यातील अनुक्रमे २७१ व २५७अपघात जीवघेणे होते, तर १९८ व २२९ अपघात गंभीर स्वरूपाचे होते. अपघातामुळे २०२४ मध्ये २८६, तर २०२५ मध्ये २६९ जणांचा मृत्यू झाला होता. अपघातांचे वाढते प्रमाण आणि बळींची संख्या पाहून पोलिस खात्याकडून अपघातांची व बळींची संख्या कमी करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत.
या अपघातांना वाहतूक नियमांचे उल्लंघन हे अनेक कारणांपैकी एक कारण आहे. त्यामुळे वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उभारणे आणि चालकांची जनजागृती करणे अशा दोन टप्प्यांवर काम सुरू आहे. दोन वर्षांत किती गुन्हे, किती दंड? २०२४ व २०२५ या दोन वर्षांची तुलना करता २०२४ मध्ये वाहतूक नियमभंगाच्या ४ लाख १० हजार १२५ घटना घडल्या. याप्रकरणी पोलिसांकडून २४ कोटी ७४ लाख ४२ हजार ४०० रुपये एवढा दंड जमा करण्यात आला. दोन वर्षांची तुलना करता २०२५ मध्ये दंडाच्या रूपाने १२ कोटी ९९ लाख २५ हजार ३०० रुपये इतका महसूल कमी जमा झाला. दोन वर्षात कमी झालेल्या महसुलाची रक्कम ५२.५१ टक्के एवढी होती. केसेसचा विचार करता २०२४ मध्ये ४ लाख १० हजार १२५, तर २०२५ मध्ये २ लाख १४ हजार ६०२ एवढी केसेसची संख्या होती.
डिसेंबर २०२४ मध्ये गुन्हे अधिक, दंड वसुली कमी २०२४व २०२५ मधील डिसेंबर महिन्याचा विचार करता अनुक्रमे २२,९३२ व २०,९४२ एवढे वाहतूक नियमभंगाचे गुन्हे दाखल झाले होते. यातून पोलिसांनी डिसेंबर २०२४ मध्ये १ कोटी ५३ लाख ६३ हजार ६०० रुपये, तर डिसेंबर २०२५ मध्ये २ कोटी ३७ लाख ७१ हजार एवढा दंड वसूल केला होता.
दंडात्मक कारवाई
सन दंड (कोटी रु.)
२०२४ : २४.७४
२०२५ : ११.७५
अपघातात घट
सन अपघात
२०२४: २,६८२
२०२५: २,३७०
मृत्यूतही घट
सन अपघात
२०२४: २८६
२०२५: २६९