मडगाव : पुढारी वृत्तसेवा
नुवे येथील सँड्रा गुदिन्हो यांच्या घरात भरदिवसा झालेल्या चोरीप्रकरणी मायना-कुडतरी पोलिसांनी अर्जुन गायकवाड (२१) या आणखी एका संशयिताला मुंबईतून अटक केली आहे. यापूर्वी, चोरीसाठी वापरलेली कार आणि तिचा चालक दीपक मंडकी (रा. जालना, महाराष्ट्र) याला औरंगाबाद येथून ताब्यात घेण्यात आले होते.
नुवे येथील गुदिन्हो कुटुंबीय रविवारी, ११ जानेवारी रोजी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी गेले असताना, चोरट्यांनी बंद घराचा फायदा घेऊन ३.१० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व इतर मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये महाराष्ट्रातील पासिंग असलेली इनोव्हा गाडी संशयास्पदरीत्या आढळून आली होती. त्याआधारे पोलिसांनी चालक दीपक मंडकी याला अटक करून गुन्ह्यात वापरलेली गाडी जप्त केली. या प्रकरणातील इतर संशयितांचा शोध सुरू असतानाच, आता अर्जुन गायकवाड याला मुंबई येथून अटक करण्यात आली आहे.