उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकारी अंकित यादव यांनी जीएसपीसीबीच्या निलंबित सदस्य सचिव डॉ. शमिला मोन्तेरो यांना समन्स बजावले आहेत.
हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन नाईट क्लबमधील भीषण आगीची सखोल चौकशी सुरू आहे.
गृह विभागाने दंडाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष चौकशी समिती स्थापन केली आहे.
आगीस जबाबदार घटक व प्रशासकीय त्रुटींचा तपास या चौकशीत केला जाणार आहे.
उत्तर गोवा येथील जिल्हा दंडाधिकारी अंकित यादव यांनी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (जीएसपीसीबी) निलंबित सदस्य सचिव डॉ. शमिला मोन्तेरो यांना समन्स बजावले आहेत. हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीची चौकशी करण्यासाठी गृह विभागाने दंडाधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती स्थापन केली आहे.
या समितीसमोर मोन्तेरो यांना हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा दंडाधिकारी आणि समितीच्या अध्यक्षांसमोर प्रत्यक्ष हजर राहताना सर्व संबंधित कागदपत्रे, रेकॉर्ड किंवा साहित्य आणण्यास सांगण्यात आले आहे.
६ डिसेंबर रोजी मध्यरात्री हडफडेतील नाईट क्लबमध्ये भीषण आग लागली. यात पर्यटकांसह २५ जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आतापर्यंत सहाजणांना अटक झाली असून चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
सदर बेकायदा चालणाऱ्या नाईट क्लबच्या संदर्भात जीएसपीसीबीची काय भूमिका होती, परवाने दिले होते का आदींचे स्पष्टीकरण मोन्तेरो यांना दंडाधिकाऱ्यांसमोर द्यावे लागणार आहे. नाईट क्लबचे मालक सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा यांना गुरुवारी थायलंट पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना भारतात आणण्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे.
चौघांच्या कोठडीत वाढ
हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन जळीतकांड प्रकरणी अटकेत असलेल्या चारही संशयित आरोपींच्या कोठडीत म्हापसा न्यायालयाने पाच दिवसांची वाढ केली आहे. राजीव मोडक, प्रियांशु ठाकूर, राजवीर सिंघानिया आणि विवेक सिंग यांच्या पोलिस कोठडीत पाच दिवसांची वाढ केली आहे.