पणजी : बनावट मद्याचे गोव्यामध्ये उत्पादन होत नाही; मात्र कोणी मद्याची बेकायदा वाहतूक करत असेल, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाते. आतापर्यंत अनेकांवर कारवाई करण्यात आली आहे. धारगळ येथे बेकायदा मद्य वाहतूक प्रकरणाची चौैकशी सुरू आहे. त्यात दोेषी आढळणार्यांवर कठोर कारवाई करू, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी विधानसभेत दिले.
प्रश्नोत्तर तासाला आमदार वेंझी व्हिएगस यांनी या संबंधी प्रश्न विचारला होता. वेंझी म्हणाले, धारगळ येथे बेकायदा मद्य वाहतूक करणारा नागालँड येथील टेम्पो जळाला होता. आग लागली म्हणून हे बेकायदा मद्य वाहतूक प्रकरण उघड झाले. यापूर्वीही अशाच प्रकारे वाहतूक झालेली असू शकते. पोलिस व अबकारी खात्याचे अधिकारी काय कारवाई करतात, असा प्रश्न विचारून या व्यवहारातील दोषींची नावे जाहीर करून त्यांना त्वरित निलंबित करण्याची मागणी व्हिएगस यांनी केली. त्याचबरोबर हा बेकायदा मद्यसाठा ट्रकमध्ये कुठे भरण्यात आला, ते बनावट मद्य आहे का, असा प्रश्न विचारून अबकारी अधिकारी सेटिंग करून अशा टेम्पोना सोडतात, असा आरोप त्यांनी केला.
आमदार क्रुझ सिल्वा यांनी बनावट मद्यनिर्मिती गोव्यात होत असल्यास ती गंभीर बाब असल्याचे सांगून सरकारने याबाबत कठोर पावले उचलण्याची मागणी केली. आमदार जीत आरोलकर यांनी बनावट दारू तपासण्याची कोणती यंत्रणा सरकारकडे आहे, असा प्रश्न विचारला.
युरी आलेमाव यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये 1395 बेकायदा मद्य वाहतुकीच्या केसेस नोंद झाल्याचे सांगून त्यामध्ये फक्त दोघा निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे सांगितले. सरकार अशा प्रकरण़ांत कठोर कारवाई करत नसल्याने बेकायदा मद्याची वाहतूक वाढल्याचा आरोप आलेमाव यांनी केला. आमदार नीलेश काब्राल यांनी नागालँडचे वाहन गोव्यात रिकामे आले होते की काहीतरी घेऊन आले होते आणि ते गोव्यामध्ये आले तर त्याची माहिती वाहतूक खात्याला का नव्हती, असा प्रश्न उपस्थित केला.
तपासणी नाक्यांवरील अधिकार्यांची वारंवार बदली करण्याची मागणी आमदार विरेश बोरकर यांनी केली. अॅड. कार्लोस फेरेरा म्हणाले, बिल न देता तो मद्यसाठा खरेदी केला होता, त्याची नोंद सरकारने घ्यावी. आमदार विजय सरदेसाई यांनी लाटंबार्सेच्या अंतर्गत रस्त्यावरून बेकायदा मद्य वाहतूक होत असल्याचा दावा करत होते तेथे चेक पोस्ट सुरू करण्याची मागणी केली.