मडगाव ः मारहाणीमुळे विद्यार्थ्याच्या मानेवर झालेले व्रण. Pudhari File Photo
गोवा

कुडचडेत शिक्षकाची शालेय विद्यार्थ्याला अमानुष मारहाण

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मारहाणीचे प्रकार राज्यात गाजत असताना कुडचडे येथील एका शाळेत शिक्षकांनी दंगामस्ती करणार्‍या इयत्ता नववीतील विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या मारहाणीत विद्यार्थ्याच्या मानेला जबर दुखापत झाली असून, त्याचे गंभीर पडसाद कुडचड्यात उमटले आहेत. त्या शिक्षकाला अटक करून त्याच्यावर गंभीर स्वरुपाची कारवाई करावी, या मागणीसाठी सोमवारी मोठ्या संख्येने पालक आणि इतर नागरिक कुडचडे पोलिस ठाण्यावर मोर्चा नेणार असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

सविस्तर माहितीनुसार, मारहाणीची ही घटना काही दिवसांपूर्वी घडलेली आहे. मात्र, विद्यार्थ्याचे दुखणे वाढल्याने त्याने हा प्रकार पालकांना सांगितला. पालकांनी पोलिस तक्रार केली आहे. मात्र, या मारहाणीच्या प्रकारामुळे कुडचडेत संताप व्यक्त होत आहे. हा विद्यार्थी कुडचडेतील एका नामांकित व्यापारी कुटुंबातील आहे. विद्यार्थी वर्गात दंगामस्ती करत असल्याचे कारण पुढे करून त्याला वर्गातच मारहाण करण्यात आली. शिक्षकाने त्याच्या मानेवर मारल्यामुळे मानेला जबर दुखापत झाली असून, मारहाण करताना गुप्तांगही दाबल्याने त्या विद्यार्थ्याला तीव्र वेदना सहन कराव्या लागत आहेत.

मारहाण झाली त्या दिवशी इतर विद्यार्थीही त्या ठिकाणी उपस्थित होते. सुरुवातीला घाबरून त्याने मारहाणीची माहिती पालकांना दिली नाही. मात्र, मारहाणीमुळे त्याला वेदना होऊ लागल्यामुळे आणि उलटी झाल्यामुळे पालकांनी चौकशी केली असता त्याने घडलेला प्रकार त्यांना सांगितला. शिक्षकाने केलेल्या माराचे व्रण अजून त्या विद्यार्थ्याच्या मानेवर आहेत. यापूर्वी त्याने तीन मुलांना अशाचप्रकारे मारहाण केली होती. मात्र ती मुले गरीब कुटुंबातील असल्यामुळे त्या प्रकरणातून तो शिक्षक सहीसलामत सुटला होता. विशेष म्हणजे क्रीडा क्षेत्रात हा शिक्षक प्रसिद्ध आहे. त्या शिक्षकावर कारवाईची मागणी पालकांनी केली आहे.

काही दिवसांपूर्वी याच शाळेतील विद्यार्थिनींना मारहाण करण्याचा प्रकार अभ्यास दौर्‍यादरम्यान घडला होता. गोव्याबाहेर दौर्‍यावर गेलेल्या मुलींना शिक्षकाकडून मारहाण झाली होती. नववीतील विद्यार्थ्याला झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर त्या मुलींच्या मारहाणीच्या विषयाला वाचा फुटली असून या घटनेला जबाबदार असलेल्या शिक्षकावर कारवाईची मागणी पालकांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT