पणजी : गोवा सरकारच्या नदी परिवहन खात्याने राज्यातील नऊ फेरीबोट मार्गांचे खासगीकरण करण्यात आले आहे. हे मार्ग खासगी क्षेत्राला आऊटसोर्स करण्यात आले आहेत. नदी परिवहन खाते केवळ इंधन आणि देखभालीची जबाबदारी सांभाळणार आहे. नदी परिवहन खात्याचे संचालक विक्रमसिंह राजेभोसले यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, 18 पैकी निम्म्या फेरीबोट मार्गांचे आता खासगीकरण झालेले आहे.
कर्मचारी सहा दशकांपासून दोन पाळ्यांमध्ये काम करत होते आणि कर्मचार्यांना ओव्हरटाइमसाठी पैसे मिळत होते. तथापि, नवीन नियमांतर्गत, कामगार आता ओव्हरटाइमशिवाय तीन पाळ्यांमध्ये काम करतील. या खासगीकरणामुळे पगारावर खर्च होणारे राज्याचे वार्षिक 10 कोटी रुपये आणि ओव्हरटाइम खर्चाचे अतिरिक्त 3 ते 4 कोटी रुपये वाचतील, अशी अपेक्षा आहे.
कर्मचार्यांच्या पगारावर फेरीबोट चालवण्यासाठी दरमहा 8 ते 9 लाख रुपये खर्च येतो. आता, आम्ही त्यांना प्रत्येक फेरीबोटीसाठी दरमहा 3.3 लाख रुपये देत आहोत. प्रत्येक फेरीबोटींवर दरमहा 6 लाख रुपये वाचणार आहेत. असे राजेभोसले यांनी सांगितले.11 फेरीबोटींवर आम्ही दरमहा 66 लाख वाचवत आहोत. त्यासोबत 3 ते 4 कोटी रुपये ओव्हरटाइम पेमेंटमध्येही बचत करत आहोत. नदी परिवहन खात्याचे उत्पन्न दरवर्षी 1 कोटी आहे. दरवर्षी 79 कोटींचे नुकसान होत आहे. नवीन प्रणालीमुळे आम्हाला दरवर्षी 14 कोटी रुपये वाचण्यास मदत होईल.असेही त्यांनी सांगितले.
सांपेद्र-दिवाडी मार्गावर दोन नव्या फेरीबोटी, चोडण-रायबंदरनंतर आता सांपेद्र - दिवाडी या जलमार्गावरही दोन नव्या रो-रो फेरीबोट सुरू करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. या रो रो फेरीबोटी 21 मीटर लांबीच्या असतील, अशी माहिती राजेेभोसले यांनी दिली. चोडण-रायबंदर जलमार्ग लांब पल्ल्याचा असल्याने तसेच तेथून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने त्याठिकाणी कार्यरत असलेल्या दोन्ही रो रो फेरीबोटी या 35 मीटर लांबीच्या आहेत. सापेंद्र-दिवाडी मार्गावर 21 मीटर लांबीच्या दोन मिनी रो-रो फेरीबोटी सुरू केल्या जातील. सध्या तरी या मार्गावर किती तिकीट आकारणी करायची हे अद्याप ठरले नाही. सरकार त्याबाबत निर्णय घेईल. जून 2026 मध्ये सांपेद्र दिवाडी हा जलमार्गावर रो रो सुरू होतील, असे त्यांनी सांगितले.