गोवा

Goa News : कोण आहेत नीलेश काब्राल? भाजपचा कुडचडेतील आक्रमक चेहरा

पर्रीकरांचे निष्ठावंत म्हणून ओळख

पुढारी वृत्तसेवा

पणजी : माजी केंद्रीय संरक्षणमंत्री व गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी अनेक नवे चेहरे राजकारणात आणले. त्यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे नीलेश काब्राल. २०१७ साली पर्रीकर यांनी संरक्षणमंत्रिपद सोडून गोव्यात मुख्यमंत्री म्हणून परतायचे ठरवले तेव्हा काब्राल यांनी त्यांच्यासाठी कुडचडेची जागा मोकळी करण्याची - म्हणजेच राजीनामा देण्याची- तयारी दाखवली होती. पर्रीकरांचे निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख.

राजकारणात येण्यापूर्वी त्यांचा ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्टर हा व्यवसाय होता. २०१२ साली त्यांना भाजपने कुडचडेत उमेदवारी दिली. निवडून आल्यानंतर अत्यंत आक्रमक आणि अभ्यासू आमदार म्हणून त्यांनी अल्पावधीत ओळख निर्माण केली.

१० जुलै १९७२ रोजी जन्मलेल्या काब्राल यांची कुडचडे ही कर्मभूमी. वडील जुआंव काब्राल हे कामानिमित्त या ठिकाणी स्थलांतरीत झाले. त्यांचे वेर्णा येथे मूळ गाव आहे. नीलेश काब्राल यांनी शासकीय पॉलिटेक्निक पणजी येथून १९९२ साली मायनिंग आणि माईन सर्व्हेईंग मध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा केला आहे. २०२२ च्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण मालमत्ता सुमारे २८.२३ कोटी रुपये दाखवली आहे.

२०१७ साली पर्रीकर मंत्रिमंडळात ते वीज, अपारंपरिक ऊर्जा, कायदा व न्याय आणि विधिमंडळ कामकाज मंत्री होते. नंतर डॉ. प्रमोद सावंत मंत्रिमंडळात त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, पर्यावरण, कायदा आणि विधिमंडळ कामकाज यांसारखी खाती आली.

गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून ७ वर्षे काम करताना त्यांनी महामंडळ नफ्यात आणल्याचा दावा ते करतात.

सप्टेंबर २०२२ मध्ये काँग्रेसच्या ८ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना दिलेल्या आश्वासनामुळे भाजप हायकमांडने काब्राल यांना ‘त्याग’ करण्यास सांगितला. नोव्हेंबर २०२३ मध्ये त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि नुवे मतदारसंघाचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिमंडळात जागा मिळाली.

मंत्रिमंडळातून बाहेर पडल्यापासून आपले खच्चीकरण होत असल्याचा आरोप ते करतात. आपल्या मतदारसंघात इतर उमेदवारांना प्रोत्साहन दिले जात आहे असेही त्यांचे म्हणणे आहे. एका कोअर कमिटी बैठकीत त्यांनी याविरुद्ध आवाज उठवत मला उमेदवारी मिळणार की नाही ते आताच सांगा, म्हणजे मी निर्णय घ्यायला मोकळा असे पक्षाला सांगितले होते. त्यानंतर तो वाद तिथेच मिटला होता. मात्र, त्यानंतरही आपल्याला बाजूला केले जात असल्याचा सल त्यांच्या मनात आहे.

अलीकडेच एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले की, ‘आता भाजपने उमेदवारी दिली तरी ती स्वीकारायची की नाही याबद्दल मला दोनदा विचार करावा लागेल.’ सिक्वेरांसाठी त्यांनी मंत्रिपद सोडले होते. मात्र नंतर जेव्हा सिक्वेरा यांना राजीनामा द्यावा लागला तेव्हा ते मंत्रिपद त्यांच्याकडे यायला हवे होते असे मत ते व्यक्त करतात. पण पक्षाने दिगंबर कामत यांना संधी दिली.

आक्रमक भाषणशैली, थेट बोलणे आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेली पकड यामुळे ते भाजपचे दक्षिण गोव्यातील महत्त्वाचे नेते मानले जातात. आता २०२७ च्या निवडणुकीपूर्वी भाजप त्यांची नाराजी दूर करण्यात यशस्वी होतो का, की कुडचडेत नवा राजकीय प्रयोग होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT