Electric Bus  (File Photo)
गोवा

Nashik Traffic Restrictions 2026 | खासगी बसेसचा प्रवास पुन्हा तपोवनातूनच

Nashik Traffic Restrictions 2026 | आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी नाशिक पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी नाशिक पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरातील सर्व खासगी ट्रॅव्हल्स बसथांबे, पिकअप व ड्रॉप पॉइंट्स तसेच पार्किंग स्थळे रद्द करून ती तपोवन सिटीलिंक बस टर्मिनस येथेच स्थलांतरित करण्याबाबतची अधिसूचना आणखी तीन महिन्यांसाठी लागू करण्यात आली आहे.

ही सुधारित अधिसूचना १ मार्च २०२६ ते ३१ मे २०२६ या कालावधीत अंमलात राहणार आहे. द्वारका सर्कल येथील भुयारी मार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. शहरातील वाहतुकीचा हा मुख्य केंद्रबिंदू असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचे वळविणे करण्यात आले आहे.

याशिवाय शहरात सुमारे ३० रस्त्यांची विकासकामे, रुंदीकरण, दुरुस्ती तसेच चार उड्डाणपुलांचे बांधकाम आणि ड्रेनेज, पाइपलाइन यांसारखी पायाभूत सुविधा कामे सुरू आहेत. परिणामी द्वारका सर्कल, मुंबईनाका सर्कल, रुची हॉटेल परिसर, ठक्कर बाजार, ट्रॅक्टर हाउस, तिग्रानिया रोड, कन्नमवार पूल आदी भागांमध्ये वाहतूक कोंडीची शक्यता वाढली आहे.

खासगी ट्रॅव्हल्स बसेस शहरात मुक्तपणे फिरल्यास या कोंडीत मोठी भर पडण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. यापूर्वी १ फेब्रुवारी २०२० रोजी निर्गमित आदेशानुसार सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांना तसेच खासगी प्रवासी बसांना शहरात प्रवेशबंदी लागू आहे.

रात्री १० नंतर ते सकाळी ८ पूर्वीच अशा वाहनांना शहरात प्रवेश देता येणार आहे. या नियमांची अंमलबजावणी कायम ठेवत सर्व खासगी प्रवासी बसेसना तपोवन सिटीलिक बस टर्मिनस येथूनच प्रवाशांची चढ-उतार व थांबा घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

उप आयुक्त (मुख्यालय/वाहतूक) किरिथिका सी.एम. यांनी मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम ११५ तसेच महाराष्ट्र पोलिस कायदा १९५१ च्या कलम अंतर्गत ३३(१) (ब) असलेल्या अधिकारांचा वापर करून ही अधिसूचना जारी केली आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन अधिनियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. शहरातील सर्व नागरिक, खासगी बस मालक व चालक यांनी या आदेशाची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT